डॉ. कल्याण काळे यांना 'मसाप'चा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार जाहीर

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या वतीने, कै. डॉ. गं. ना. जोगळेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, दरवर्षी मराठी वाङ्मयक्षेत्रातील कार्याबद्दल, एक मानाचा पुरस्कार दिला जातो. प्रसिद्ध भाषातज्ज्ञ व समीक्षक डॉ. कल्याण काळे यांना यावर्षीचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बुधवार दि. १४ ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ६. ३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ समीक्षक डॉ. निशिकांत मिरजकर यांच्या हस्ते हा पुरस्कार डॉ. कल्याण काळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, डॉ. जोगळेकर यांच्या कन्या उज्ज्वला जोगळेकर, चिरंजीव पराग जोगळेकर, परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कार्यवाह बंडा जोशी यांनी दिली.