कवितेचे बहरलेले झाड उन्मळून पडले
साहित्य परिषदेत कवी अनिल कांबळे यांना मान्यवरांची श्रद्धांजली
पुणे : कविता हाच अनिल कांबळे यांचा ध्यास आणि श्वास होता. त्यांनी कवितेसाठी सर्वस्व अर्पण केले. त्यांच्या निधनाने कवितेचे बहरलेले झाड उन्मळून पडले अशा शब्दात साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी कवी अनिल कांबळे यांना श्रद्धांजली वाहिली. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्यादीप प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अनिल कांबळे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभेचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, ज्योत्स्ना चांदगुडे, धनंजय तडवळकर यावेळी उपस्थित होते. रामदास फुटाणे, रमण रणदिवे, उल्हासदादा पवार, विजय कोलते, रतनलाल सोनग्रा, विलास अत्रे, संगीता जोशी, माधव हुंडेकर, दीपक करंदीकर, उद्धव कानडे, बंडा जोशी, संदीप अवचट, स्वाती सामक, कबीर पटेल, आदींनी यावेळी अनिल कांबळे यांच्या आठवणींना उजाळा दिला. या श्रद्धांजली सभेला अनिल कांबळे यांचे चाहते आणि सर्व वयोगटातील कवींनी मोठी गर्दी केली होती.
श्रीपाल सबनीस म्हणाले, 'कांबळेंनी वंचितांची दुःखं आपल्या कवितेतून मांडली आणि त्यांचा आवाज बुलंद केला.'
रामदास फुटाणे म्हणाले, 'कवितेचे कार्यक्रम करण्यासाठी कांबळेंनी नेहमीच पदरमोड केली. करायचे ते उत्तम असा त्यांचा स्वभाव होता. त्यांनी बजेटकडे कधी पाहिले नाही.'
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, 'अनिल कांबळे हे अंतर्बाह्य कवी होते. त्यांनी कवितेसाठी तन मन आणि धन अर्पण केले. ते काव्यमग्न कवी असले तरी इतर कवींना आणि त्यांच्या कवितांना त्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. त्यांची कविता प्रकाशित यावी यासाठी पुढाकार घेतला. कांबळेच्या निधनाने कवितेचे बहरलेले झाड उन्मळून पडले.
रमण रणदिवे म्हणाले, 'दुसऱ्यांना मोठं म्हणण्याएवढा मनाचा मोठेपणा कांबळे यांच्याकडे होता. त्यांच्या प्रोत्साहनामुळे अनेक कवी पुढे आले.'
उल्हासदादा पवार म्हणाले, 'कवितेचे दोन दिवस सारखे उपक्रम सुरु करून कांबळेंनी अनेकांना व्यासपीठ मिळवून दिले.'
अनिल कांबळे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पुढील वर्षीपासून साहित्यादीप प्रतिष्ठानच्या वतीने एका ज्येष्ठ कवीचा आणि संयोजकाचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येईल असे ज्योत्स्ना चांदगुडे यांनी सांगितले.