इतर भाषांना राजकीय हेतूने अभिजात दर्जा : डॉ. निशिकांत मिरजकर

'मसाप'चा डॉ. गं. ना. जोगळेकर पुरस्कार डॉ. कल्याण काळे यांना प्रदान
पुणे : मराठी ही अभिजात भाषा आहेच फक्त तसा अधिकृत दर्जा शासनाने दिलेला नाही, तो लवकर मिळायला हवा. इतर भाषांना राजकीय हेतूने अभिजात दर्जा दिला जातो, असे प्रतिपादन प्रख्यात समीक्षक आणि अभ्यासक डॉ. निशिकांत मिरजकर यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद आयोजित कै. डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कारप्रदान समारंभात ते बोलत होते. यावर्षीचा पुरस्कार भाषातज्ज्ञ डॉ. कल्याण काळे यांना डॉ. निशिकांत मिरजकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, डॉ. गं. ना. जोगळेकर यांचे चिरंजीव पराग जोगळेकर आणि कन्या डॉ. उज्ज्वला जोगळेकर उपस्थित होते.
मिरजकर म्हणाले, 'डॉ. गं. ना. जोगळेकर हे भाषाविज्ञान आणि प्रमाण मराठी भाषेबाबत आग्रही होते. सध्या मात्र विनाकारण भाषेचे सुलभीकरण करण्यासाठी प्रमाणभाषा आणि शुद्धलेखनाचे नियम सोपे करून अर्थाचा अनर्थ करण्याकडे चाललो आहोत.'
डॉ. कल्याण काळे म्हणाले,'परभाषिकांशी मराठी माणूस हिंदी किंवा इंग्रजीत बोलतो त्यामुळे मराठी भाषा शिकण्याची त्याला गरज वाटत नाही. ही आपली अतिथ्यशीलता आपल्याला नडते. व्यवहारात एखाद्या भाषेची अपरिहार्यता आणि गरज असेल तरच ती भाषा टिकते अन्यथा ती नामशेष होते.'
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, 'जोगळेकर हे मराठीची वाड्मयीन गुणवत्ता आणि भाषेची शुद्धता याबाबत सजग होते. आज मागणी नसताना अभ्यासक्रमात नियम शिथिल करून मराठी भाषालेखन, वाचनाबाबत आपण अकारण मुलांच्या क्षमतांवर संशय घेत आहोत.'
डॉ. कल्याणी दिवेकर, डॉ. विद्यागौरी टिळक, डॉ. स्नेहल तावरे, डॉ. सुजाता शेणई, कार्यवाह दीपक करंदीकर, अरविंद संगमनेरकर आणि उद्धव कानडे उपस्थित होते. प्रकाश पायगुडे यांनी प्रास्ताविक केले. सुनिताराजे पवार यांनी आभार मानले. बंडा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.