top of page

मसाप ब्लॉग  

लोकसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे यांची निवड

डॉ. सरोजिनी बाबर जन्मशताब्दी निमित्त आयोजन

पुणे : लोकसाहित्याच्या ज्येष्ठ संशोधक आणि संकलक, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी रविवार दि. १ सप्टेंबर २०१९ रोजी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी ११ ते सायंकाळी ७. ३० या वेळेत लोकसाहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. अरुणा ढेरे यांची निवड करण्यात आली आहे. लोकरंग सांस्कृतिक मंच, ठाणे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि राष्ट्रसेवा प्रतिष्ठान बावधन यांच्या संयुक्त विद्यमाने हे लोकसाहित्य संमेलन होणार आहे.

लोकसाहित्य संमेलनाचे उदघाटन सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सांस्कृतिक कार्य व मराठी भाषा विकास, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. सरोजिनी बाबर यांच्या भगिनी डॉ. कुमुदिनी पवार समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती लोकरंग सांस्कृतिक मंचच्या अध्यक्षा शैला खांडगे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा . मिलिंद जोशी, आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष पुणे मनपाचे सदस्य दिलीप वेडे-पाटील यांनी दिली.

डॉ. सरोजिनी बाबर यांनी लोकसाहित्य संकलन आणि संपादनाचे ऐतिहासिक कार्य केले. कुलदैवत, लोकसंगीत, एक होता राजा, जाई मोगरा, बाळ राजे, जनलोकांचा सामवेद असे अनेक ग्रंथ डॉ. सरोजिनी बाबर यांनी संपादित केले. महाराष्ट्र शासनाच्या लोकसाहित्य समितीच्या डॉ. सरोजिनी बाबर अनेक वर्षे अध्यक्ष होत्या. विधान परिषद, राज्य सभा सदस्यपदही त्यांनी भूषविले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारे चर्चासत्र लोकसाहित्य संमेलनात आयोजित करण्यात आले आहे. डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, डॉ. माहेश्वरी गावित, सिसिलिया कार्व्हालो, उल्हासदादा पवार आदी मान्यवर परिसंवादात सहभागी होणार आहेत. लोकसाहित्य आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचा साहित्यातील लोकरंग कार्यक्रम दु. ४. ०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. यात महाराष्ट्राच्या लोककलांचे दर्शन घडणार आहे. डॉ. सरोजिनी बाबर यांनी जानपद गीतांचेही मौलिक संपादन केले. मंगळागौर, भोंडला, स्त्रियांची गीते यांचे दर्शनही या लोकसाहित्य संमेलनात होईल. अशी माहिती संमेलनाच्या संयोजन समितीच्या अध्यक्षा ज्येष्ठ पत्रकार राही भिडे आणि संयोजन प्रमुख लोककलेचे अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी दिली. या लोकसाहित्य संमेलनात शाहीर हेमंतराजे मावळे आपल्या शिष्यांसह पोवडा सादर करतील.



Featured Posts
Recent Posts
Archive