समितीची पुनर्स्थापना लवकरच

लोकसाहित्य जतन करण्याबाबत डॉ. नीलम गोर्हे करणार सरकारला सूचना
पुणे : राज्याला लोकसाहित्याची परंपरा आहे. लोकसाहित्याचा ठेवा जतन करण्यासाठी राज्य सरकारला लोकसाहित्य समिती पुनर्स्थापना करण्याची सूचना करणार आहे. असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी सांगितले. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लोकरंग सांस्कृतिक मंच, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि राष्ट्रसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने लोकसाहित्य संमेलन यशवंतराव चव्हाण नाटयगृह येथे आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर महापौर मुक्ता टिळक, संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कुमुदिनी पवार, विजयमाला कदम, राही भिडे, शैला खांडगे, मिलिंद लेले, माजी नगरसेवक योगेश मोकाटे आणि आयोजक नगरसेवक दिलीप वेडे-पाटील उपस्थित होते. डॉ. नीलम गोर्हे म्हणाल्या, 'राज्य सरकारला लोकसाहित्य समिती पुनर्स्थापित करून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या जाणार आहेत. याबाबत बैठक घेऊन पाठपुरावाही केला जाईल. लोकसाहित्य जतन होण्यासाठी सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने राज्यातील विद्यापीठांमध्ये लोकसाहित्याची अध्यासने निर्माण झाली पाहिजेत.'
डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या, 'लोकसाहित्याचा अभ्यास हा वेगळ्या दृष्टीकोनातून करणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यापीठांमध्ये अध्यासने झाली पाहिजेत. त्यातून लोकसाहित्याचे संचित अभ्यासण्याची नवी दृष्टी मिळू शकेल. मौखिक वाङमयाची परंपरा खूप प्राचीन आहे. मौखिक वाड्मय हीच अभिजात साहित्यपरंपरेची जन्मदात्री आहे. हे वास्तव ध्यनात घेऊन लोकवाड्मयाच्या आणि लोकपरंपरेच्या गंभीर अभ्यासाला गेल्या शतकात जगभर सुरुवात झाली. महाराष्ट्रात १९ व्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध हा कालखंड म्हणजे लोकसाहित्याभ्यासाचा उदयकाळ होता.'
देशभर विविध संशोधनसंस्था या लोकसाहित्याच्या आणि लोककलांच्या संकलन, जतन आणि अभ्यासामध्ये कार्यरत आहेत. मात्र, आपले समृद्ध लोकसंचित अभ्यासणारी आणि एकात्मतेची देशव्यापी अशी आंतरवीज उलगडणारी एकही सक्षम संस्था अस्तित्वात नाही.'
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, 'सरोजिनी बाबर यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे होते. राजकारणात असूनही त्यांनी लेखनाकडे दुर्लक्ष केले नाही.'
यावेळी कुमुदिनी पवार यांनी सरोजिनी बाबर यांच्याविषयीच्या आठवणी सांगितल्या. वेडे-पाटील यांनी प्रास्ताविक केले. भिडे यांनी संमेलनाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश पायगुडे यांनी केले, तर प्रकाश खांडगे यांनी आभार मानले.