मराठी माणसांच्या हृदयातील अढळ स्थान हेच गदिमांचे चिरंतन स्मारक : प्रा. मिलिंद जोशी

पुणे : गदिमांच्या निधनाला चाळीस वर्षे झाली. गदिमांच्या जन्मशताब्दीची सांगता व्हायची वेळ आली तरी त्यांचे यथोचित स्मारक त्यांची कर्मभूमी असलेल्या पुण्यात होऊ शकले नाही. इतकी सरकारे आली गेली पण कोणीही काहीही ठोस केले नाही. गदिमांच्या स्मारकाबाबत राज्यकर्ते असंवेदनशील आहेत. समस्त मराठी जनतेने गदिमांना आपल्या हृदय सिहासनावर जे आदरांचे अढळ स्थान दिले आहे तेच त्यांचे चिरंतन स्मारक आहे. असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र वाल्मिकी ग दि माडगूळकर जन्म शताब्दीवर्ष सांगता निमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद आणि शब्दधून यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. स्नेहल दामले आणि चैत्राली अभ्यंकर यांनी गदिमांच्या गीतातील स्त्री जाणिवांचे दर्शन घडविणारा जागर 'ती'चा हा सांगीतिक कार्यक्रम सादर केला. परिषदेचे कार्यवाह दीपक करंदीकर यावेळी उपस्थित होते.
प्रा. जोशी म्हणाले, 'गदिमा हे प्रतिभेचे उत्तुंग शिखर आहे. त्यांचे नाव घेताच मराठी माणसांच्या मनात आनंदाचे आणि अभिमानाचे कारंजे सुरू होते. अंगणात प्राजक्ताचा सडा पडावा तसा गदिमांच्या प्रतिभा सृष्टीत शब्द सुमनांचा सडा पडत असे. ही शब्दफुले वेचून त्याच्या काव्यमाला तयार करून गदिमा त्या सरस्वतीच्या चरणी अर्पण करीत. फुले सुकतात देवाला वाहिली तरी दुसऱ्या दिवशी त्यांचे निर्माल्य होते पण गदिमांच्या काव्यफुलांना अम्लानतेचे वरदान लाभले आहे. त्यांचे साहित्य हा मराठीचा चिरंतन ठेवा आहे. आपल्या सांस्कृतिक संचिताचे नवसर्जन करून गदिमांनी गीत रामायणासारखी अजरामर कलाकृती कलाकृती निर्माण केली. या गीत रामायणामुळे गदिमा महाराष्ट्राचे वाल्मिकी झाले. सुधीर फडके स्वरतीर्थ झाले. दोघांनी मिळून भावभक्तीचे पावनतीर्थ निर्माण करीत महाराष्ट्राची श्रवण संस्कृती समृद्ध केली. नाच रे मोरा, पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आज कुणीतरी यावे, जिवलगा कधी रे येशील तू, का रे दुरावा, या चिमण्यांनो,तोडीता फुले मी, फड सांभाळ तुर्याला ग आला, या सुखांनो या यासारखी गीते सादर करून चैत्राली अभ्यंकर यांनी श्रोत्यांची वाहवा मिळवली स्नेहल दामले यांनी या गीतातील स्त्री जाणिवांवर भाष्य केले. दीपक करंदीकर यांनी आभार मानले.