भेटलेल्या माणसांनीच दिली विचारांची श्रीमंती : डॉ. विश्वास मेहंदळे
परिषदेमध्ये रंगल्या मसाप गप्पा

पुणे : काळ बदलला. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थिती बदलली माझ्या शालेय जीवनातील पुणे आता एक टक्काही राहिले नाहीत. त्यावेळी पुण्यात फिरताना अनेक विचारवंत, ज्ञानवंत भेटायचे त्यांच्यापुढे माथा नम्र व्हायचा. कलेला प्रतिभेला आणि लेखकांना त्याकाळात फार महत्त्व होते. ते दिवस आता राहिले नाही. संगणक युगात माणसं माणसापासून दूर गेली. संस्कार करणारी माणसं भेटत नाहीत. माझ्या उमेदीच्या काळात अशी संस्कार विद्यापीठे मला भेटत गेली. भेटलेली माणसं मी वाचत गेलो. एकेक माणूस मी मनात साठवत गेलो. या भेटलेल्या माणसांनीच मला विचारांची श्रीमंती दिली. म्हणून माझे आयुष्य सुजलाम सुफलाम झाले असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रसारमाध्यम तज्ज्ञ डॉ. विश्वास मेहंदळे यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मसाप गप्पा या कार्यक्रमात ते बोलत होते. कवी उद्धव कानडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यावेळी उपस्थित होते. मसापचे कार्यवाह वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.
डॉ. महेंदळे म्हणाले, 'यशवंतराव चव्हाण ते विलासराव देशमुख असे अनेक मुख्यमंत्री मी पाहिले. यांच्या भेटीमुळे मी यशवंतराव ते विलासराव हा ग्रंथ लिहिला. तो खूप लोकप्रिय झाला. इंदिरा गांधी ते लीला गांधी, पंडितजी ते अटलजी, गांधीजी ते पटेल या ग्रंथांमुळे मी वाचकप्रिय झालो. माध्यमे हा माझा ध्यास होता. पुणे विद्यापीठ, सिम्बायोसिस विद्यापीठ येथे मी माध्यम शिक्षणाचे काम अधिक व्यापक बनवले. दूरदर्शन, आकाशवाणी या माध्यमात काम केल्यामुळे मला अनेक उपक्रम राबविता आले. बातम्या देणारा पहिला वृत्तनिवेदक मीच ठरलो. प्रत्येक शाळेत मराठी विषय सक्तीचा झालाच पाहिजे. मसापने एवढी आंदोलनं करूनही केंद्र सरकार मराठीला अभिजात भाषेचा दर्जा का देत नाही. हे न सुटणारे कोडे आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे. समारोप करताना मला भेटलेली माणसे या एकपात्री प्रयोगातिला काही भाग त्यांनी सादर केला आणि रसिकांची दाद मिळवली. मसाप गप्पा च्या कार्यक्रमाला रसिकांनी गर्दी केली होती.
