स्त्रियांनी संघर्षात डगमगू नये : संगीता जोशी

पुणे : स्त्री शक्ती म्हणजे शारीरिक शक्ती नव्हे. स्त्री शक्ती म्हणजे आंतरिक शक्ती असते. स्त्रीमध्ये अनेक गुण असतात. त्यांच्या गुणांचा दबाव समाजावर असतो. आता संघर्ष करताना स्त्रियांनी संघर्षात डगमगू नये. असे मत ज्येष्ठ गझलकार संगीता जोशी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि साहित्यदीप प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र महोत्सवानिमित्त स्त्रीशक्ती, स्त्रीजाणिवा आणि स्त्रीमुक्तीच्या कवितांचा जागर 'कविता दुर्गेच्या' या निमंत्रित कवयित्रींच्या संमेलनात अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, प्रमोद आडकर, उद्धव कानडे, ज्योत्स्ना चांदगुडे, धनंजय तडवळकर उपस्थित होते. संगीता जोशी म्हणाल्या, 'आज सदगुणी स्त्रीया विविध क्षेत्रात मेहनतीने परिवर्तन घडवून आणत आहेत. हिमतीने जग बदलण्याचे काम आज अनेक स्त्रिया करत आहेत. स्त्रीया प्रतिकूल परिस्थितीत स्वबळावर उभ्या राहतात. स्त्री शक्तीचा समाजाने आदर केला पाहिजे. स्त्रीच्या प्रामाणिकपणाचा समाजाने उपयोग करून घेतला पाहिजे. स्त्रियांनी स्वतःच सदगुणांची शिकार होऊ नये. न्यायदेवतेला आंधळे ठेवू नये. डोळसपणाने समाजाने वागावे. आता तलाकची भीती स्त्रियांना राहिली नाही.'
कविता दुर्गेच्या या आगळ्यावेगळ्या कवयित्री संमेलनात स्वाती सामक, अंजली कुलकर्णी, ज्योत्स्ना चांदगुडे, प्रभा सोनावणे, भारती पांडे, मृणालिनी कानिटकर-जोशी, प्राजक्ता, पटवर्धन, वर्षा कुलकर्णी, आरती देवगावकर, माधुरी गयावळ, प्रतिभा पवार, संध्या वाघ, मानसी चिटणीस, स्नेहराणी गायकवाड, सविता इंगळे, अमिता सामंत, समृद्धी सुर्वे, संगीता झिंजुरके, जयश्री श्रोत्रिय, रूपा बेंडे, मनिषा भोसले आणि अनघा सोमण या विविध क्षेत्रातून आलेल्या कवयित्रींनी आपल्या कविता सादर केल्या. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन जोत्स्ना चांदगुडे आणि मृणालिनी कानिटकर-जोशी यांनी केले.
प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी प्रास्ताविक केले. ज्योत्स्ना चांदगुडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यवाह प्रमोद आडकर यांनी आभार मानले. कार्यवाह उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. धनंजय तडवलकर, उदय कुलकर्णी आणि विजय शेंडगे यांनी संयोजन केले.