top of page

मसाप ब्लॉग  

जन्मापासून आयुष्याशी भांडत आलो : रमजान मुल्ला

मसापमध्ये 'एक कवी एक कवयित्री' कार्यक्रम

पुणे : कोणत्या जातीधर्मात जन्माला यायचं आपल्या हातात नसतं. मी तर जन्मापासूनच आयुष्याशी भांडत आलो आहे. असे मत कवी रमजान मुल्ला यांनी व्यक्त केले. मसापच्या 'एक कवी एक कवयित्री' या कार्यक्रमात महापुरात सर्वस्व गमावलेले रमजान मुल्ला आणि लता ऐवळे यांची मुलाखत उद्धव कानडे आणि प्रमोद आडकर यांनी घेतली. यावेळी व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि सुनिताजें पवार उपस्थित होते.

रमजान मुल्ला म्हणाले, 'जाती जातीची कंपूशाही मोडता आली पाहिजे. जाती-धर्माचा झेंडा हातात घेण्यापेक्षा कवींनी माणुसकीचा झेंडा हातात घ्यावा. माणूस हाच धर्म असतो. महापुरात माझ्या संवेदनांना आग लागली. आत जाळ असूनही शब्द कागदावर उतरला नाही. मदतीचा प्रचंड ओघ आला. तेव्हा कळले की इन्सानियत हाच खरा जिहाद आहे. सौंदर्य बघणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून असतं. टोचून लिहिणं, टीका करणं म्हणजे कविता नाही. खरं लिहिणं म्हणजे कविता असते. माणसं जोडते ती खरी कविता असते. कविता चाकोरीत अडकवून चालणार नाही.' रमजान मुल्ला यांनी 'काय असतं बाई', 'धोंडा', 'मुलगी म्हणजे काय', 'शालू राबते' आणि 'काफिर' या कविता सादर केल्या.

लता ऐवळे म्हणाल्या, 'वडिलांच्या मनातलं दुःख आईच्या दुःखापेक्षा मोठं असतं. प्रचंड कष्टातून मी उभी राहिले. शिक्षणानं माझ्या आयुष्याच्या वाटा उजळल्या. कविता खूप वाचल्या, ऐकल्या. श्रवण संस्कार मोलाचा असतो. माझा बाप शब्दात मावत नाही. आई इतकाच बाप मोठा असतो. माझा बाप मला आई म्हणायचा. बापाचे ते शब्द काळजात घर करून बसले. महापुराच्या आठवणी भयानक आहेत. आता पाण्याची भीती वाटते. अनुभवलेल्या वेदना शब्दांच्या पलीकडल्या आहेत. मराठीत चांगली कविता आहे. चांगले समीक्षक आहेत. पण त्यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. लता ऐवळे यांनी 'नक्की काय नसतं बाईकडे', 'धागा', 'विठ्ठल मंदिर', 'साक्षीदार' आणि 'बाप' या कविता सादर केल्या. प्रास्ताविक प्रा. मिलिंद जोशी यांनी केले. आभार प्रमोद आडकर यांनी मानले. सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.


Featured Posts
Recent Posts
Archive