कोजागिरी पौर्णिमेनिमित नव्या जुन्याच्या काठावर रंगले कविसंमेलन
पुणे: "खूप दारं आहेत या कवितेला
ती शोधून काढण्याचा खेळ तुम्हाला खेळायचा आहे. "


अशा अनेक आशयगर्भ कविता सादर करीत सम्मेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ कवयित्री डॉ अरुणा ढेरे यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. भा. रा. तांबे. गदिमा, बा. भ. बोरकर,कवी बी, वसंत बापट, जगदीश खेबुडकर, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर ,ग्रेस, शांता शेळके यांच्या कवितेतले मर्म डॉ ढेरे यांनी बोलण्यातून उलगडले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी कवी साहित्यिकांच्या आठवणी जागवत मैफलीत रंग भरला. कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी काव्यवाचनातून आणि ज्येष्ठ गायिका जयश्री कुलकर्णी यांनी काव्य गायनातून काव्य विश्वाची सफर घडवली. नव्या जुन्याच्या काठावरचे हे कविसंमेलन उत्तरोत्तर रंगत गेले. निमित्त होते कोजागिरी पौर्णिमेनिमित महाराष्ट्र साहित्य परिषद आणि ढेपे वाडा यांच्या संयुक्त विद्यमाने ढेपे वाड्यात आयोजित साहित्य संवाद मैफलीचे.यावेळी ढेपे वाडा सांस्कृतिक मंडळाचे उदघाटन डॉ ढेरे यांच्या हस्ते करण्यात आले.यशश्री पुणेकर यांनी सूत्रसंचालन केले. नितीन ढेपे, ऋचा ढेपे, परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, पुणे जिल्हा प्रतिनिधी राजन लाखे, लेखिका वीणा देव,नीलिमा बोरवणकर, माधुरी वैद्य, प्रियांका कर्णिक,संगीता पुराणिक, कवयित्री आश्लेषा महाजन, मृणालिनी कानिटकर,रमेश आणि रसिका राठीवडेकर, अभिनेता आदिश पायगुडे ,स्नेहा अवसरीकर, स्नेहल दामले, विठ्ठल काटे, मकरंद टिल्लू,डॉ वैभव ढमाळ ,प्रा रुपेश थोपटे,मोहन टिल्लू, विठ्ठल काटे,नंदकुमार काकीर्डे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ ढेरे म्हणाल्या, जुन्या तले सगळेच टाकाऊ नसते .नव्यातले सगळेच स्वीकारावे असे नसते.परंपरा आणि नवतेचा सुवर्णमध्य साधतच पुढे जावे लागते.
चौकट: त्यांना कवी समवेत छायाचित्र हवे आहे का?
प्रा मिलिंद जोशी यांनी कवी बा भ बोरकर यांची आठवण सांगितली. एका बहुभाषिक कवी संमेलनासाठी दिल्लीत बोरकरांना निमंत्रित केले होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान उपस्थित राहणार होते.कार्यक्रम स्थळी असणारा एक छायाचित्रकार बोरकरांना म्हणाला, तुम्हाला पंतप्रधानांसमवेत छायाचित्र हवे आहे का?त्यावर बोरकर हसत म्हणाले, पंतप्रधानांना विचारा त्यांना कवी बोरकरांसमवेत छायाचित्र हवे आहे का?त्यावर तो छायाचित्रकार शांतच झाला. असा आपल्या प्रतिभेविषयीचा विश्वास आणि ठामपणा जुन्या कवी साहित्यिकांकडे होता.

