मसाप ब्लॉग  

ग्रंथपालांमुळेच ग्रंथालये श्रीमंत होतात : डॉ. शकुंतला काळे

October 15, 2019

 

साहित्य परिषदेत वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने ग्रंथपालांचा सन्मान

पुणे : ग्रंथपाल हे विद्याधनाचे कुबेर आहेत. ग्रंथपाल जितके जाणकार तितके ग्रंथ जाणतेपणाने वाचकांपर्यंत पोचतात. त्यातून वाचन संस्कृतीचे भरण पोषण होते. ग्रंथपालांमुळेच ग्रंथालये श्रीमंत होतात असे मत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने वाचन प्रेरणदिनाच्या निमित्ताने भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर पुणे या संस्थेच्या ग्रंथपाल मेघना देशपांडे, पुणे मराठी ग्रंथालयाच्या ग्रंथपाल संजीवनी अत्रे, पुणे नगर वाचन मंदिराच्या ग्रंथपाल सविता गोकुळे, महाराष्ट्र गांधी स्मारक भवनचे ग्रंथपाल कैलास यादव, सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रतिभा साखरे आणि रावसाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालयाचे ग्रंथपाल दिलीप भिकुले या ग्रंथपालांचा सन्मान डॉ. शकुंतला काळे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार आणि कार्यवाह वि. दा. पिंगळे यावेळी उपस्थित होते. सर्व सन्मानप्राप्त ग्रंथपालांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

डॉ. शकुंतला काळे म्हणाल्या, 'महान व्यक्तींना ग्रंथ, ग्रंथपाल आणि ग्रंथालयांनी घडविले आहे. ग्रंथालयाची समृद्धी ही पुस्तके आणि ग्रंथपालांमुळेच वाढते.'

 

प्रा. जोशी म्हणाले, 'ग्रंथपाल हा ग्रंथालयाचा आरसा असतो. ग्रंथपाल हे चोखंदळ वाचक आणि ग्रंथ यांच्यातला महत्त्वाचा दुवा म्हणून काम करीत असतात. चांगली पुस्तके जाणकार वाचकापर्यंत ग्रंथपालांमुळेच पोचतात. ग्रंथपाल हे वाचन संस्कृतीचे रक्षक आहेत. समाजमानस घडविण्यात ग्रंथालयांचे योगदान खूप मोठे आहे. वाचन हा केवळ छंद न राहता तो समाजाच्या जीवनशैलीचा भाग बनला पाहिजे. वडीलधारी माणसे आणि शिक्षक पुस्तके वाचताना दिसली तरच मुले आणि विद्यार्थी वाचनाकडे वळतील. तंत्रज्ञानाचे आक्रमण लक्षात घेता वाचन संस्कृतीची पालखी ज्यांच्या खांद्यावर आहे त्या तरुणपिढीला वाचनमग्न करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रकाश पायगुडे यांनी प्रास्ताविक केले. सुनीताराजे पवार यांनी आभार मानले. वि. दा. पिंगळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive