सांगली जिल्हा नगर वाचनालयाला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि रोटरीची पुस्तकसाथ
संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते देणार ११,५०० ग्रंथ, ९ नोव्हेंबरला सांगलीत कार्यक्रम
पुणे : अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्याला भीषण पुरस्थितीचा सामना करावा लागला. या महापुरामुळे असंख्य लोकांचे संसार उध्वस्त झाले. हजारो लोक बेघर झाले. या महापुरामुळे अनेक वर्षांची परंपरा असलेली आणि वाचनसंस्कृती समृद्ध करणारी ग्रंथालये अक्षरशः जलमय झाली. हजारो पुस्तकांचा अक्षरशः लगदा झाला. ही ग्रंथालये पुन्हा पुस्तकांनी फुलून जाण्यासाठी आणि त्यांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने पुस्तकप्रेमींना ग्रंथरूपाने मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यातून जमा झालेले १०००० ग्रंथ साहित्य परिषद सांगली जिल्ह्य नगर वाचनालयाला देण्यात येणार आहेत. रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटी यांच्या वतीने १५०० ग्रंथ देण्यात येणार आहेत. शनिवार, ९ नोव्हेंबर रोजी सांगली जिल्हा नगर वाचनालयात मसाप आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या कार्यक्रमात साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते हे ग्रंथ वाचनालयाला देण्यात येणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. या कार्यक्रमाला परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीच्या अध्यक्ष सुजाता कुलकर्णी, सचिव प्रियांका कर्णिक, खजिनदार रवी कुलकर्णी, पूर्वाध्यक्ष दीपा गाडगीळ, महेश भागवत वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. मुकुंद पटवर्धन, सहकार्यवाह सुहास करंदीकर, उपाध्यक्ष डॉ. हणमंतराव शिंगारे, कार्यवाह अजित गिजरे, परिषदेच्या सांगली शाखेचे अध्यक्ष वैजनाथ महाजन सांगली जिल्हा प्रतिनिधी प्रा. दशरथ पाटील उपस्थित राहणार आहेत.
प्रा. जोशी म्हणाले, "महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आवाहनाला साहित्यप्रेमींनी उत्तम प्रतिसाद देत पूरग्रस्त ग्रंथालयाला मदत करण्यासाठी परिषदेकडे ग्रंथ दिले. आत्मचरित्रे, चरित्रे, कथा, कादंबरी, प्रवासवर्णन, कवितासंग्रह, वैचारिक अशा विविध वाड्मय प्रकारांबरोबर, विश्वकोश, भक्तिकोश, यांच्यासह दुर्मिळ पुस्तकेही साहित्यप्रेमींनी पूरग्रस्त ग्रंथालयासाठी दिली आहेत. त्या सर्वांची परिषद ऋणी आहे.
स्नेहल जोशी यांनी संपूर्ण ग्रंथालयच दिले
सिंहगड रस्ता परिसरात राहणाऱ्या स्नेहल जोशी यांनी चार हजार पुस्तकांचे ग्रंथालय पूरग्रस्त भागातील ग्रंथालयासाठी दिले आहे. त्या उद्योजक आहेत. त्यांचा इलेक्ट्रिकल कंट्रोल पॅनल बनविण्याचा व्यवसाय आहे. अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेतलेल्या स्नेहल जोशी यांनी वाचनाचा छंद जोपासला. तो वाढविताना त्याचा इतरांनाही लाभ व्हावा म्हणून आनंदनगर भागात त्यांनी वाचनालय सुरु केले. संपूर्ण ग्रंथालयाच त्यांनी साहित्य परिषदेला पूरग्रस्त भागातील ग्रंथालयाला मदत करण्यासाठी दिले. असे प्रा. जोशी यांनी सांगितले.