समीक्षा संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रेखा इनामदार-साने
७ डिसेम्बरला धुळे येथे होणार संमेलन

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा धुळे आणि जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट संचालित झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालय देवपूर धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समीक्षा संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. रेखा इनामदार-साने यांची निवड करण्यात आली आहे. हे संमेलन ७ डिसेम्बरला धुळे येथे होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
साहित्य समीक्षा : नवे दृष्टीकोन असे सूत्र असणाऱ्या या संमेलनाचे उदघाटन जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून जय हिंद शैक्षणिक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अरुण साळूंके, उपाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, सचिव दादासाहेब भदाणे, प्रा. सुधीर पाटील मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, संमेलनाचे निमंत्रक रावसाहेब पवार, जळगाव जिल्हा प्रतिनिधी प्राचार्य तानसेन जगताप, धुळे-नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी डॉ. शशिकला पवार यांच्यासह कार्यकारी मंडळाचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.
प्रा. जोशी म्हणाले, 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उत्सवी वातावरणात गंभीरपणे साहित्यचर्चा होत नाही अशी अनेक सारस्वतांची खंत होती त्यामुळे समीक्षा संमेलन घेण्यास साहित्य परिषदेने सुरुवात केली. आजवर प्रा. के. रं. शिरवाडकर, प्रा. रा. ग. जाधव, प्रा. वसंत आबाजी डहाके, डॉ. सुधीर रसाळ, डॉ. दिलीप धोंडगे, डॉ. हरिश्चंद्र थोरात आणि डॉ. नागनाथ कोत्तापल्ले या मान्यवरांनी समीक्षा संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.यावर्षी ज्येष्ठ समीक्षक रेखा इनामदार-साने यांची निवड करताना परिषदेला आनंद आणि समाधान वाटत आहे.
उदघाटनानंतर होणाऱ्या दुसऱ्या सत्रात शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांचे भाषण होणार आहे. तिसऱ्या सत्रात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. आशुतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या साहित्य समीक्षा : नवे दृष्टीकोन या विषयावरील परिसंवादात डॉ. एकनाथ पगार, डॉ. महेंद्र कदम, डॉ. संजयकुमार करंदीकर, डॉ. रामचंद्र काळूंखे सहभागी होणार आहेत. समारोपापुर्वीच्या सत्रात खुले निंबध वाचन होणार आहे.