लेखक बालकुमारात मिसळणारा असावा : ल म कडू
साहित्य परिषदेत रंगले बालकुमारांसाठीचे कविसंमेलन

पुणे : बालकुमारांसाठी लिहिणे ही जोखीम असते. साहित्याची भाषा आणि चित्राची रेषा जेव्हा हातात हात घालून जाईल तेव्हाच उत्तम साहित्य मुलांसाठी निर्माण होईल. लेखक मुलांमध्ये मिसळले तरच त्यांना मुलांचे भावविश्व समजेल. लेखक बालकुमारात मिसळणारा असावा असे मत मुलांसाठी लिहिणारे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक ल म कडू यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने योगिनी जोगळेकर स्मृती दिन आणि बालदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह दीपक करंदीकर, सुधनवा जोगळेकर उपस्थित होते.
कडू म्हणाले, 'मुलांना स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असते याचे भान लेखक, पालक आणि शिक्षकांना असले पाहिजे. मुलांना बोधपर आणि उपदेश पर साहित्य आवडत नाही हे समजले पाहिजे. मोठ्यांनी मुलांच्या कलागुणांना उत्तेजन दिले पाहिजे.'
प्रा. जोशी म्हणाले, 'मुलांसाठी लेखन करणारे अनेक लेखक स्वतःचे बालपण समोर ठेवून लेखन करतात पण काळाचे बरेच पाणी दरम्यान वाहून गेले आहे याची जाणीव त्यांना नसते आजच्या मुलांच्या भावविश्वातले त्यांना आपलेसे वाटतील असे विषय साहित्यात आले पाहिजेत. आज कुटुंबात एकच मूल असते त्यामुळे प्रेम आणि अपेक्षा यांचा कडेलोट होताना दिसतो. मुलांना रेसचे घोडे बनविले जाते. मुलांच्या जीवनशैलीत अवांतर वाचन आणि खेळ यांना स्थान नाही. पालक आणि शिक्षक वाचताना दिसले तरच मुले वाचतील. साहित्यामुळेच मुलांचे भावनिक भरणपोषण होईल.' यावेळी आश्लेषा महाजन, कविता क्षीरसागर, संगीता पुराणिक, बाळकृष्ण बाचल, ऋचा कर्वे, सुजाता पवार, अपर्णा आंबेडकर, स्वाती यादव, जयश्री देशकुलकर्णी, विजया देव आणि संध्या गोळे या कवींनी एकलव्य संस्थेतील उपस्थित बालकुमारासाठी कविता सादर केल्या ऋचा कर्वे यांनी सूत्रसंचालन केले.
