सरदेशमुख हे मराठी साहित्य सृष्टीतील अविनाशी चंद्रफुल : डॉ. प्रिया निघोजकर
साहित्य परिषदेत त्र्यं. वि. सरदेशमुख जन्मशताब्दी कार्यक्रम

पुणे : सरदेशमुखांची 'तादात्म्यता' हीच त्यांच्या सर्जनशील प्रतिभेचा मूलस्रोत होता. सरदेशमुखांनी आपल्या समग्र साहित्यातून श्रद्धा ,निष्ठा, जीवनमूल्ये यांचा शोध घेतला आहे. यातच त्यांचे थोरपण आहे. ' काव्यात्म संवेदन' हे आणखी एक त्यांच्या लेखनाचे वेगळेपण होते. सरदेशमुख हे मराठी साहित्य सृष्टीतील अविनाशी चंद्रफुल आहे असे मत ज्येष्ठ अभ्यासक डॉ प्रिया निघोजकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित थोर साहित्यिक त्र्यं. वि. सरदेशमुख जन्मशताब्दी कार्यक्रमात त्या बोलत होत्या आत्मनिष्ठ साहित्यिक त्र्यं. वि. सरदेशमुख हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी प्रमुख पाहुणे प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर, मसाप चे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे उपस्थित होते. डॉ. निघोजकर म्हणाल्या, 'सरदेशमुखांची समीक्षा हाही स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे. जे जे उच्छेद्य आहे त्याचा उच्छेद न झाला तरी चालेल; पण जे जे आस्वाद्य आहे त्याचा सूक्ष्म अस्वाद घेतला पाहिजे, हे सूत्र ठेवून सरदेशमुख यांनी काव्यसमीक्षा व नाट्यसमीक्षा केली. महत्त्वाचा असा काव्यविचार मांडला. जागतिक पातळीवरील अभिजात साहित्याचा व साहित्यिकांचा सरदेशमुख यांनी सखोल अभ्यास केला होता. स्वतःच्या संवेदनेची पारख करून त्यांनी आपले समानधर्मी शोधले. अनुवादासाठी त्यांनी निवडलेल्या साहित्यकृती व साहित्यिक पाहिले की याची प्रचीती येते. नोबेल पारितोषिक विजेता हर्मन हेसे, व्हीक्टर ह्युगो, फ्रांझ काफ्का, निकोलस बर्दिएव्ह, लिओ टॉलस्टॉय, सार्त्र, अल्बेर काम्यू, बर्टोल्ट ब्रेख्त, युजिन आयनेस्को या पाश्चात्य प्रतिभावंतांसोबतच ज्ञानदेव, तुकाराम, रामदास, जे कृष्णमूर्ती त्यांना आपले सांगाती वाटले. कन्नड महाकवि द .रा. बेंद्रे ,गुरुदेव रानडे, बाबामहाराज आर्वीकर ही त्यांची श्रद्धास्थाने होती. या सर्वांच्या भावचिंतनातून साहित्यिक सरदेशमुख घडले.
नायगावकर म्हणाले, 'सरदेशमुख हे जागतिक कीर्तीचे कादंबरीकार आहेत. ते लेखकांचे लेखक आहेत. त्यांच्या लेखनाने मराठीत मानदंड निर्माण केला. त्यांचे बुद्धीची दमछाक करणारे साहित्य तरुण पिढीने वाचले पाहिजे. त्यांची समीक्षा थेट कवितेला भिडणारी आहे. सर्व कवींनी त्यांची समीक्षा समजून घेतली पाहिजे. प्रा. जोशी म्हणाले, 'सरदेशमुखानी त्यांच्या कादंबऱ्यातून व्यक्तिगत तसेच सामूहिक संसार दुःखाची गाथा उलगडली ती उलगडताना दुःखाला छेद द्यायला सद्भाव आणि सामंजस्य यापेक्षा काहीही सक्षम नाही हेच त्यांनी घटना प्रसंगातून आणि व्यक्तिदर्शनातून सांगितले. एकीकडे भारतीय संतांचे विचार तर दुसरीकडे पाश्चात्य विचारवंतांचे जीवन विषयक चिंतन यांच्या चिंतनातून त्यांनी मानवी अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले. दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.