राजकीय वर्तमानामुळे राज्याची पिछेहाट : अनंत दीक्षित
साहित्य परिषदेत 'स्मरण यशवंतरावांचे' या विषयावर व्याख्यान

पुणे : काल जे विरोधी पक्षात होते ते आज सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन करतात. यशवंतरावांनी जपलेले वैचारिक चारित्र्य आजच्या राजकारणात दिसत नाही. कोणावर विश्वास ठेवायचा हाच समाजासमोरचा मोठा प्रश्न आहे. सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याची मानसिकता लोकशाहीसाठी घातक आहे. राजकीय वर्तमानामुळे राज्याची पिछेहाट झाली आहे असे मत ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 'स्मरण यशवंतरावांचे' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. व्यासपीठावर परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे उपस्थित होते.
दीक्षित म्हणाले, 'सध्या राज्यात आणीबाणीसदृश्य परिस्थिती आहे. पहाटेच शपथविधी उरकला जातो. सत्तेचा प्रभाव किती किळसवाणा असू शकतो याचे दर्शन सध्या घडते आहे. यशवंतराव चव्हाण हे परिपक्व पिढीच्या राजकारणाचे श्रेष्ठ प्रतिनिधी होते. ते चारित्र्य संपन्न, संवेदनशील आणि विचारशील नेते होते. त्यांनी आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी केली. सत्तेशिवाय काम करता येते असा विश्वास देणारी मंडळी यशवंतरावांच्यावेळी राजकारणात होती ते चित्र आज दिसत नाही.
प्रा. जोशी म्हणाले, 'यशवंतरावांनी 'समाजकेंद्री' राजकारण केले. आजचे राजकारण व्यक्तिकेंद्री आणि पक्षकेंद्री झाले आहे. सुधारणेला संस्कृतीचे अधिष्ठान असले पाहिजे हा यशवंतरावांचा विचार आजचे राजकारणी विसरले आहेत. यशवंतरावांचे चरित्र आजच्या राजकारण्यांनी वाचले पाहिजे'. प्रकाश पायगुडे यांनी प्रास्ताविक केले. दीपक करंदीकर यांनी आभार मानले. वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले.