मसाप ब्लॉग  

राजवाड्यांची चिकित्सा तटस्थ होती : श्री. मा. भावे

November 28, 2019

 

साहित्य परिषदेत अहिताग्नी राजवाडे यांनी पाहिलेले राजकारण या विषयावर व्याख्यान

पुणे : 'अहिताग्नी राजवाडे यांनी लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी या दोघांचीही राजकीय कारकीर्द पहिली. टिळकांच्या राजकारणात ते प्रत्यक्ष सहभागी झाले होते, तर गांधीजींचे राजकारण त्यांनी दुरून पाहिले. प्रत्येक विषयाची चिकित्सा त्यांनी अतिशय तटस्थपणे केली. चिकित्सा करताना त्यांनी कोणाचाही द्वेष केला नाही. संकटांचा, अन्यायाचा बाऊ केला नाही. आयुष्यात पराभवाने खचून चालत नाही, तो पचवून पुढे चालत रहावे लागते. हा संदेश त्यांनी समाजाला दिला, असे प्रतिपादन इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष श्री. मा. भावे यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने अहिताग्नी शं. रा. राजवाडे स्मृतिदिनानिमित्त 'अहिताग्नी राजवाडे यांनी पाहिलेले राजकारण' या विषयावर ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह दीपक करंदीकर, गायत्री राजवाडे, शैला मुकुंद उपस्थित होते.

भावे म्हणाले, 'राजवाडे सन्मित्र मेळ्यामध्ये सहभागी होत असत; मात्र स्वतःचे नाव त्यांनी कधीही पुढे येऊ दिले नाही. गोखलेवर टीका झाल्यावर सन्मित्र मेळा बंद पडला. टिळकांची कारकीर्द १९०२ नंतर बहरली. त्यावेळी सुरतेतील काँग्रेस, पुण्यातील मद्यपानबंदी चळवळ, तसेच केसरी, मराठाच्या कामगिरीतही अहिताग्नी यांचा सहभाग होता. त्यांनी ठिकठिकाणी प्रवास करत व्याख्याने दिली आणि त्यातून समाज जाणून घेतला. प्रत्येक गोष्टीचा सर्व बाजू बाजूंनी अभ्यास करून त्यांनी चिकित्सक वृत्तीने आपले विचार मांडले. १९२० साली त्यांनी अग्निहोत्र स्वीकारले. पुण्यातील प्लेगची साथ, चापेकर बंधूनी केलेला रँडचा खून, चापेकर बंधूना झालेली फाशीची शिक्षा अशा अनेक घटनांशी राजवाडे यांचा जवळून सबंध आला. मद्यपान बंदी काळात राजवाडे यांच्या घरी शुक्रवार क्लब भरायचा. १९१७ साली त्यांनी राजकीय घडामोडीतून पूर्ण माघार घेतली. जॅक्सन याच्या खुनानंतर सरकारने प्रचंड दडपशाही केली, अनेक लोकांना तुरुंगात डांबले. याबद्दलही राजवाडे यांनी विस्तृतपणे लिहून ठेवले आहे.' दीपक करंदीकर यांनी आभार मानले.

 

चौकट

*अहिंसक मार्गावर नव्हता विश्वास

गांधी युगाच्या राजकारणात त्यांनी फारसा भाग घेतला नाही, त्यांनी लांबून हा लढा पहिला. गांधीजी कायम सरकारशी लढत राहिले. मात्र निशस्त्र लढाई, अहिंसा या मार्गाने स्वातंत्र्य मिळणार नव्हते असे राजवाडे यांचे मत होते. नाटक, साहित्य, कला, वैद्यकशास्त्र, कुस्तीशास्त्र अशा अनेक विषयांमध्ये त्यांना रस होता.'

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018