उत्तम कवी हा उत्तम वाचक असतो : डॉ. मनोहर जाधव
साहित्य परिषदेत महात्मा फुले अभिवादन कविसंमेलन

पुणे : काळाप्रमाणे संस्था बदलल्या तर समाज परिवर्तन घडते. प्रबोधनकारांनी शतकाला दिशा देण्याचे काम केले. ग्रामीण भागात उत्तम कविता निर्मिती होते. अनुभवातून नवी दृष्टी मिळते. उत्तम कवी हा उत्तम वाचक असतो असे मत डॉ. मनोहर जाधव यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अक्षरभारती पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त 'महात्मा फुले अभिवादन कविसंमेलन' आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, अक्षरभारतीचे डॉ. अविनाश सांगोलेकर आणि प्रा. माधव राजगुरू उपस्थित होते. महात्मा जोतीराव फुले यांना विविधांगी कवितांमधून कवींनी महात्मा फुले यांना गुरुवारी अभिवादन केले. कवी उद्धव कानडे, दीपक करंदीकर, वि. दा. पिंगळे, साहेबराव ठाणगे, समाधान गायकवाड, नंदकुमार कांबळे आणि किरण मोरे-चव्हाण, निशिकांत देशपांडे, सीताराम नरके, किरण मोरे, नयन रणदिवे, प्रभा माटे यांनी कविसंमेलनात आपापल्या कविता सादर केल्या. जाधव म्हणाले, 'नवा सिद्धांत प्राप्त होतो. सकस आहे ते शिल्लक राहते. ठसा उमटवणारे मागे उरते. माणसं जोडणारी साहित्यनिर्मिती सोपी नसते. लेखनात गुणवत्ता असलीच पाहिजे. अनुभवातून दर्जा निर्माण होतो. अनुभव जेवढा समृद्ध तेवढं लेखन समृद्ध असतं. कवींनी सतत रियाज केला पाहिजे. नवा विचार, नवे चिंतन मांडले पाहिजे. कुठलीही गोष्ट मेहनतीने कमवावी लागते. स्वतःला अजमावून पाहणे सुंदर असते. ज्याला मर्यादा कळतात त्याला बलस्थानंही कळतात. तो माणसं वाचतो, समाज वाचतो, जगणं वाचतो. म्हणूनच कुशल असतो. अनुभव मुरला पाहिजे. मुरलेला अभिव्यक्तीची प्राक्तनाची वाट मोकळी होते. स्वतःच्या प्रेमातून बाहेर पडा. धर्मजातीचा, भेदाचा विचार सोडून समतेचा विचार अंगीकार करा. निरागसपणा हाच कवीचा खरा अलंकार असतो. कवयित्री रत्ना चौधरी यांनी आभार मानले. प्रा. रुपाली अवचरे यांनी सूत्रसंचालन केले.