माधव जूलियन हे केशवसुत आणि मर्ढेकरांमधील महत्त्वाचा दुवा : डॉ. नीलिमा गुंडी
साहित्य परिषदेत कवी माधव जूलियन स्मृतिदिन साजरा

पुणे : माधव जूलियन यांनी सुधारक मधून विवाह संस्थेतील अपप्रवृतींवर कोरडे ओढले. दंभस्फोट घडविला. आपल्या कलात्मक मूल्यांशी प्रामाणिक राहण्यासाठी त्यांनी जीवनात मोठा संघर्ष अनुभवला. पुढे त्यांना समाज मान्यता मिळाली. 'छंदोरचना' या ग्रंथासाठी मुंबई विद्यापीठाच्या डी. लिट. या पदवीचे ते पहिले मानकरी ठरले. मराठी भाषेसाठी त्यांनी मोठे योगदान दिले. माधव जूलियन हे केशवसुत आणि मर्ढेकरांमधील महत्त्वाचा दुवा आहेत असे मत ज्येष्ठ कवयित्री डॉ. नीलिमा गुंडी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने कवी माधव जूलियन स्मृतिदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ‘कवी माधव जूलियन : व्यक्तित्व आणि काव्य’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कार्यवाह दीपक करंदीकर यावेळी उपस्थित होते.
गुंडी म्हणाल्या, 'डॉ. माधवराव पटवर्धन हे बहुपेडी व्यक्तीमत्त्व होते. कवी, समीक्षक, कोशकार, अनुवादक, भाषाचळवळीचे प्रचारक, साहित्य परिषदेचे चिटणीस, फारसीचे प्राध्यापक, प्रयोगशील कलावंत आणि सुधारकी विचारांचे आगरकरशिष्य अशा अनेकविध भूमिका त्यांनी एकाचवेळी समर्थपणे पार पाडल्या. रविकिरण मंडळातले 'रवी' ही त्यांची ख्याती ऐकताना समकालीन वातावरणात तरुणांवर असलेला त्यांचा मोठा प्रभाव जाणवतो. त्यांनी गज्जल, सुनीते अशा रचनाप्रकारांचा तसेच खंडकाव्य या काव्यप्रकाराचा कलात्मक ताकदीनिशी वापर केला. त्यातून सुमारे शंभर वर्षांपूर्वी त्यांनी घडविलेली आधुनिक स्त्रीची प्रतिमा महत्त्वाची ठरते. मुक्त, धीट अशी प्रेयसी आणि तिची प्रणयाराधना करणारा प्रियकर ही त्यांच्या काव्यातील जोडी त्याकाळी टीकाविषय झाली. केशवकुमारांनी त्यावर विडंबनकविताही लिहिल्या. मात्र समाजमनाची सांस्कृतिक मूस बदलण्यासाठी अशी नव्या धाटणीची स्त्री प्रतिमा आवश्यक होती.'
प्रा. जोशी म्हणाले, ‘काव्यलेखन, काव्यविचार, काव्यसमीक्षा आणि भाषांतर अशा विविध माध्यमातून माधव जूलियन यांनी मराठी साहित्याला दिलेले योगदान मोलाचे आहे. त्यांच्याठायी असणाऱ्या कवित्व आणि पांडित्य या गुणांनी एकमेकांवर मात केली नाही. हे गुण त्यांच्या निर्मितीसाठी परस्पर पूरक आणि पोषक ठरले. माधवरावांनी भाषा आणि लेखन शुद्धीसाठी चळवळ उभारली. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले. दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.