मसाप ब्लॉग  

कणा असलेले साहित्यिक कमीच : अजीम नवाज राही

December 5, 2019

 

पुणे :  'अनुभव हेच माझे माणिक-मोती आहेत. जगण्याचे उत्खनन करीत आलो आहे. घरात साहित्यिक परंपरा नव्हती. साहित्याची आवड नव्हती पण जिज्ञासा होती. उर्दू आणि मराठी या दोन मातांनी माझी कविता जगवली. या दोन मातांचे दूध पिल्यामुळे मी कवी झालो आहे. लेखकाला विचारांचा कणा हवाच. आज कणा असलेले साहित्यिक कमी झाले आहेत असे मत प्रसिद्ध कवी अजीम नवाज राही यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'एक कवयित्री एक कवी' या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात सुचिता खल्लाळ(नांदेड) आणि अजीम नवाज राही(बुलढाणा) यांची प्रमोद आडकर आणि ज्येष्ठ कवी उद्धव कानडे यांनी प्रकट मुलाखत घेतली. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे उपस्थित होते.

 

राही म्हणाले, भाषेवर जगता येते. कवितेने माझे शल्य लपवले. जत्रा उरूस येतात आपली मूल्यांवर निष्ठा हवी. शब्दांचे पुजारी जात-धर्म मानत नाहीत. मथुरा, मक्का यापेक्षा देश महत्वाचा असतो. माझ्या वेदना कवितेने प्रवाहित केल्या. राबणारी माणसं, उपेक्षितांची दुःखे माणसांचा कल्लोळ हाच माझा एकांत आहे. कार्यशाळा घेऊन कवी तयार होत नाही. काही कवी स्थानिक तर काही कवी संस्थानिक असतात. भाजल्या शिवाय शब्दांना अर्थप्राप्त होत नाही.

 

सुचिता खल्लाळ म्हणाल्या, 'कवितेच्या प्रदेशात कंपूगिरी खूप आहे. समीक्षक नव्या प्रतिभेकडे दुर्लक्ष करतात. कवीवर जातीचे शिक्के मारू नका. कविता वाळीत टाकू नका. कविता जगवणं प्रवाहाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. कवी मेला तरी त्याची कविता जगली पाहिजे. कवीचे जगणे हराम करू नका. कवी काम करतो तेव्हा प्रवाहाचे आत्मभान जागृत करतो. काळाचा सूर ओळखून अभिव्यक्त व्हा. स्त्रीवाद कशाला हवाय? स्त्री एक माणूस आहे ही भावना महत्त्वाची आहे. नैतिकता टिकावी म्हणून कवी चौकटीबाहेरचं लिहितो. तरीही कवींच्या कळपाचे राजकारण आहे. समीक्षक एकमेकांना मोठं करतात. समीक्षा न होणं कवीचा दोष नाही. मराठी स्त्री कवितेला भान आलंय. पुरुषद्वेष्टी कविता नको.' प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले.

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts