'मसाप' च्या माधवराव पटवर्धन सभागृहात लागणार बाळासाहेब पंतप्रतिनिधींचे तैलचित्र

१५ डिसेंबरला गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी आणि डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते अनावरण
पुणे : महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असा नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेला टिळक रस्त्यावरील जागा वास्तू उभारणीसाठी उदार मनाने देणारे औंध संस्थानचे अधिपती राजा भवानराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचे तैलचित्र महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात लावण्यात येणार आहे. हे तैलचित्र लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर चिपळूण व मसाप शाखा चिपळूण यांच्यावतीने परिषदेला देण्यात आले आहे. देवरूखचे चित्रकार विक्रम परांजपे यांनी ते साकारले आहे. या तैलचित्राचे अनावरण रविवार दि. १५ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी १०. ३० वाजता बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या नातसून गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात येणार असून हा समारंभ संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
प्रा. जोशी म्हणाले, 'औंध संस्थांनचे अधिपती राजा भवानराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला टिळक रस्त्यावर वास्तू उभारण्यासाठी उदार अंतकरणाने जागा दिल्याने परिषदेची हक्काची वास्तू उभी राहू शकली. त्यामुळे परिषदेच्या कार्याला स्थैर्य आले. पुढच्या पिढयांना हा इतिहास माहित व्हावा आणि पंतप्रतिनिधी यांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करावी या भावनेने त्यांचे तैलचित्र परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात लावण्याचा निर्णय परिषदेच्या कार्यकारी मंडळाने घेतला. या तैलचित्राखाली त्यांनी परिषदेला केलेल्या मदतीचा उल्लेख करण्यात येणार आहे.'
असा घडला प्रवास
* २७ मे १९०६ रोजी पुण्यात मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात साहित्य परिषदेच्या स्थापनेची घोषणा साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी केली त्यास लोकमान्य टिळकांनी अनुमोदन दिले.
* १९०६ साली स्थापन झालेल्या परिषदेला १९१२ मध्ये नियमबद्ध व घटना मंडित करण्यात आले.
* १९१३ ते १९३२ अशी वीस वर्ष परिषदेची कचेरी मुंबईतील विविधज्ञानविस्तारच्या कार्यालयात व नंतर रावबहाद्दूर दा. ग. पाध्ये यांच्या घरी होती.
* १९३१ च्या हैद्राबाद संमेलनात संमेलनाध्यक्ष ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेची कचेरी पुण्यात नेण्यात यावी असा ठराव मंजूर करण्यात आला.
* १९३३ साली पुण्यात परिषद आल्यावर तिचे दप्तर कृ. पां. कुलकर्णी यांनी जपून ठेवले. त्यानंतर चापेकरांच्या कार्यसंस्कृती मुद्रणालयाजवळ भागवतांच्या बंगल्यात परिषदेचे कार्यालय होते.
* परिषदेचे तत्कालीन कार्याध्यक्ष ना. गो. चापेकर यांनी २१ जुलै १९३५ रोजी औंध संस्थानचे अधिपती राजा भवानराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या भेटीसाठी परिषदेचे अध्यक्ष मा. वि. किबे यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळ नेले. त्यात वा. म. जोशी, दत्तो वामन पोतदार, पा. वा. काणे, ज. र. घारपुरे, धनंजयराव गाडगीळ, दे. द. वाडेकर अशी मंडळी होती.
* पंतप्रतिनिधींनी उदार अंतःकरणाने टिळक रस्त्यावरील आपल्या मालकीची ६७७.६ चौरस यार्ड जागा परिषदेला वास्तू उभारण्यासाठी दिली.
* २८ ऑक्टोबर १९३५ रोजी परिषदेच्या वास्तूची कोनशिला रावबहाद्दूर दा. ग. पाध्ये यांच्या हस्ते बसविण्यात आली. इमारतीसाठीचा निधी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोळा केला. कोनशिला बसविण्याच्या समारंभाला न. चि. केळकर, वा. म. जोशी, माधव जुलियन, कवी गिरीश, कवी यशवंत, रा. श्री. जोग, वि. भि. कोलते, सोपानदेव चौधरी, श्री. म. माटे, के. ना. वाटवे उपस्थित होते.
औंध संस्थानचे अधिपती राजा भवानराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्याविषयी
* विद्या - कला यांना उदारहस्ते मदत करणारा राजा अशी त्यांची ओळख होती.
* खेडे स्वयंपूर्ण व्हावे असा विचार मांडणारा, स्वातंत्र्य आंदोलनातील क्रांतिकारकांना साहाय्य करणारा स्वदेशीचा प्रचार करणारा राजा म्हणून ते ख्यातकीर्त होते.
* उत्तम चित्रकार, संग्राहक, कीर्तनकार व लेखक असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व होते.
* भारतातला पहिला मुक्त तुरुंग त्यांनी आटपाडी येथे उभारला त्यावरून 'दो आँखे बारहा हाथ' हा चित्रपट निघाला.
* भारतातील तसेच परदेशातील नामवंत चित्रकारांची चित्रे त्यांनी जमा केली.
* आपल्या संस्थानातच निर्माण होणारा भाजीपाला आणि धान्य याचा वापर ते जेवणात करीत.
* संस्थानातील विणकऱ्यांनी विणलेले वस्रच वापरत. अनेक कलाकारांना आणि चित्रकरांना त्यांनी आश्रय दिला. * अनेक कला साहित्य क्रीडा विषयक काम करणाऱ्या संस्थांना मदत केली.
* 'सूर्यनमस्कार' ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे याचा प्रचार आणि प्रसार त्यांनी केला.