महाराष्ट्र साहित्य परिषद भीमगीतांनी दुमदुमली

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद आणि शाहीर हिंगे लोककला प्रबोधनी यांच्या संयुक्त विद्यमाने नितीन गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या बुद्ध, भीम, रमाई गीतांनी माधवराव पटवर्धन सभागृह दुमदुमले. साहित्य परिषदेत प्रतिवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमित्त १४ एप्रिल रोजी गेली अनेक वर्ष बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर आधारित व्याख्याने, चर्चासत्रे, कविसंमेलने परिषदेत आयोजित केली जातात. महामानव डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी अशा प्रकारचा सांगीतिक कार्यक्रम प्रथमच झाला.
औरंगाबादचे तरुण गायक, संगीतकार नितीन गायकवाड, कृतिका शेगांवकर, शुभम केंद्रे, किशोर धारासुरे अरविंद येडे, गजानन धुमाळ, अमोल गवई, सु. आ. सुधाकर, राहुल सुरवसे या गायक वादक कलावंतांनी शास्त्रीय संगीतावर आधारित भीमगीतांचा कार्यक्रम सादर केला. प्रसिद्ध शाहीर हेमंतराजे मावळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ष्ट्रगीत व पोवाडे सादर करून डॉ. बाबासाहेब आंबडेकरांना अभिवादन केले. परिषदेचे कार्यवाह दीपक करंदीकर यांनी प्रारंभी सुरेश भटांची भीमवंदना सादर करून प्रास्ताविक केले. यावेळी पुणे शहर प्रतिनिधी डॉ. अरविंद संगमनेरकर उपस्थित होते. कार्यक्रमाला साहित्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.