मसाप ब्लॉग  

मसापच्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर, २० डिसेंबरला आनंद अंतरकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

'पुरुष उवाच', 'लोकसत्ता', 'संवाद सेतू', 'चौफेर समाचार', 'छात्र प्रबोधन' आणि 'लिंग' (ऑनलाईन) या दिवाळी अंकांना सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकांची पारितोषिके

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत उत्कृष्ट दिवाळी अंकासाठीचे अ. स. गोखले स्मृतिप्रीत्यर्थ 'रत्नाकर पारितोषिक' 'पुरुष उवाच' या दिवाळी अंकाला, चंद्रकांत शेवाळे पुरस्कृत 'विविध ज्ञानविस्तारकर्ते रावसाहेब मोरमकर पारितोषिक 'लोकसत्ता' या दिवाळी अंकाला, 'मासिक मनोरंजनकार का. र. मित्र पारितोषिक' 'संवाद सेतू' या दिवाळी अंकाला, 'शं. वा. किर्लोस्कर पारितोषिक' 'चौफेर समाचार' या दिवाळी अंकाला, त्याच बरोबर डेलिहंट पुरस्कृत उत्कृष्ट ऑनलाईन दिवाळी अंकाचे पारितोषिक 'लिंग' या दिवाळी अंकाला देण्यात येणार आहे. 'जानकीबाई केळकर' स्मृतिप्रीत्यर्थ 'उत्कृष्ट बालवाङ्मयदिवाळी अंकाचे पारितोषिक' 'छात्र प्रबोधन' या दिवाळी अंकाला तसेच दिवाळी अंकातील उत्कृष्ट कथेसाठीचे 'दि. अ. सोनटक्के पारितोषिक' 'इंद्रधनुष्य' या दिवाळी अंकातील डॉ. राजश्री पाटील यांच्या 'मोडला संसार-मोडला नाही कणा' या कथेला जाहीर करण्यात आले आहे. तसेच उत्कृष्ट ललित लेखासाठीचे 'अनंत काणेकर पारितोषिक' 'ऋतुरंग' या दिवाळी अंकातील नीलिमा जाधव बंडलू यांच्या 'दिशा नावाचा माणूस' या लेखाला जाहीर करण्यात आले आहे. गेली चाळीस वर्ष आरोग्य जागर करणाऱ्या शतायुषी दिवाळी अंकाचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार २० डिसेंबर २०१९ सायंकाळी ६.१५ वा. साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात ज्येष्ठ संपादक व लेखक आनंद अंतरकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

प्रा. जोशी म्हणाले, 'दिवाळी अंकाना ११० वर्षाची गौरवशाली परंपरा आहे. दिवाळी अंक हा दीपोत्सवाच्या साक्षीने साजरा होणारा शब्दोत्सव आहे. मराठी भाषेची ही वैभवशाली परंपरा जपण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे गेली ५३ वर्ष दिवाळी अंक स्पर्धा घेतली जाते. दर्जेदार दिवाळी अंकांचा सन्मान व्हावा तसेच नव्या दमाच्या आणि कसदार लेखन करणाऱ्या लेखकांना प्रोत्साहन मिळावे, या भूमिकेतून ही स्पर्धा आयोजित केली जाते.

या स्पर्धेसाठी यावर्षी महाराष्ट्रातून १०० दिवाळी अंक आले होते. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून बबन पोतदार आणि भालचंद्र कोळपकर यांनी काम पाहिले असे कार्यवाह वि. दा. पिंगळे यांनी सांगितले.


Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
No tags yet.
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Twitter Basic Square
  • YouTube Social  Icon