मसाप ब्लॉग  

औंधचे पंतप्रतिनिधी हे साहित्य  संस्कृतीचे पाठीराखे : डॉ. अरुणा ढेरे


पुणे : शासन आणि साहित्य, कला संस्कृती यांच्यात सुसंवाद कसा असावा याचा आदर्श वस्तुपाठ औंधचे पंतप्रतिनिधी यांनी आपल्या राज्यकारभारातून घालून दिला. कलेची सौंदर्यदृष्टी आणि सामर्थ्य यांचा मिलाफ त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. त्यांनी संस्थानच्या विकासाबरोबर साहित्य संस्कृतीला पाठबळ दिले. औंधचे पंतप्रतिनिधी हे साहित्य संस्कृतीचे पाठीराखे होते असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेत औंध संस्थानचे अधिपती राजा भवानराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या तैलचित्राच्या अनावरण प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी परिषदेचे कार्यकारी विश्वस्त उल्हासदादा पवार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीतराजे पवार, मसापचे कोकण विभाग प्रतिनिधी प्रकाश देशपांडे उपस्थित होते.

हे तैलचित्र लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर चिपळूण आणि मसाप चिपळूण शाखा यांच्या वतीने परिषदेला देण्यात आले असून देवरूखचे चित्रकार विक्रम परांजपे यांनी ते साकारले आहे.

प्रा. जोशी म्हणाले, 'औंध संस्थांनचे अधिपती राजा भवानराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला टिळक रस्त्यावर वास्तू उभारण्यासाठी उदार अंतकरणाने जागा दिल्याने परिषदेची हक्काची वास्तू उभी राहू शकली. त्यामुळे परिषदेच्या कार्याला स्थैर्य आले. पुढच्या पिढयांना हा इतिहास माहित व्हावा आणि पंतप्रतिनिधी यांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करावी या भावनेने त्यांचे तैलचित्र परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात लावण्याचा निर्णय परिषदेच्या कार्यकारी मंडळाने घेतला. या तैलचित्राखाली त्यांनी परिषदेला केलेल्या मदतीचा उल्लेख करण्यात येणार आहे.

उल्हासदादा पवार म्हणाले, 'पंतप्रतिनिधी हे आदर्श राजे होते महर्षी आणि राजर्षी असे हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व होते.’

प्रकाश देशपांडे म्हणाले, 'इतिहास विसरला की भूगोल बदलतो म्हणून इतिहासाचे स्मरण महत्त्वाचे आहे. बाळासाहेब पंत प्रतिनिधी हे जनतेचे राजे होते त्यांनी लोकांच्या हिताचे राज्य केले. सुनिताराजे पवार यांनी आभार मानले. वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले.


Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
No tags yet.
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Twitter Basic Square
  • YouTube Social  Icon