कवी कृ. ब. निकुंब यांच्या कवितेची कक्षा व्यापक होती : डॉ. विद्यागौरी टिळक

मसापच्या का. र. मित्र व्याख्यानमालेला प्रारंभ
पुणे : कवी कृ. ब. निकुंब यांनी वयाच्या अठराव्या वर्षापासून कविता करायला सुरुवात केली होती. त्यांचे वाचन आणि निरीक्षण अतिशय सूक्ष्म होते. त्यांच्या कवितेत काळाचे प्रतिबिंब उमटले आहे. समकालीन राजकारणाचे पडसाद त्यांच्या कवितेत आहेत. त्यांच्या काही कविता सामाजिक, राजकीय संदर्भाच्या होत्या. आत्मशोध, हा त्यांच्या कवितेचा मुख्य गाभा होता. भोवतालच्या गोष्टींची जाणीव त्यांच्या कवितेतून दिसून येते. कवी म्हणून कृ. ब. निकुंब यांच्या कवितेची कक्षा व्यापक होती, असे मत साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. विद्यागौरी टिळक यांनी व्यक्त केले. निमित्त होते महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या का. र. मित्र व्याख्यानमालेचे. या व्याख्यानमालेची सुरुवात डॉ. विद्यागौरी टिळक यांच्या 'कवी कृ. ब. निकुंब : जीवन आणि कार्य' या विषयावरील व्याख्यानाने झाली. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, कार्यवाह दीपक करंदीकर उपस्थित होते.
डॉ. टिळक म्हणाल्या, ' कवी भा. रा. तांबे आणि कवी कुसुमाग्रज यांच्या कवितेतील प्रतिमा कवी निकुंब यांच्या कवितेत दिसतात. त्यांच्या 'उज्वला' ह्या काव्यसंग्रहावर कवी कुसुमाग्रज यांची छाप दिसून येते. त्यांच्या कविता ह्या भावनांना आवाहन करणाऱ्या होत्या. कुटुंबातील ताणतणावांचा अविष्कार कवितेत करण्यात निकुंब रमून जातात. निकुंब यांच्या कवितेची रचना सहज आणि सुंदर होती. त्यांनी चाळणी लावून कवितासंग्रह तयार केले होते. त्यांची काव्यनिर्मिती मोजकीच होती. त्यांच्या कवितेत वैविध्यपूर्णता, सूक्ष्मता आणि भावाविष्कार दिसून येतो. निकुंब यांच्या कवितेतील आविष्कार हे सतत बदलत गेलेले दिसतात. निसर्ग हा त्याच्या काव्याचा आशय होता. निसर्गातील सूक्ष्म तपशील त्यांच्या कवितेत दिसतात. त्यांच्या कवितेतून निसर्ग जिवंत होतो. निकुंब यांच्या कवितेत संवेदनशीलता होती. लहान मुलांच्या भूमिकेत शिरून त्यांनी बालकविता लिहिल्या. त्यांच्या बालकविता ह्या लहान मुलांच्या भावना व्यक्त करतात. त्यांचा 'फणसाचे पान' हा समीक्षाग्रंथही प्रकाशित झाला आहे. त्यांनी केलेल्या समीक्षेत 'भावबंध' या संकल्पनेला जास्त महत्त्व दिले आहे. प्रकाश पायगुडे यांनी प्रास्ताविक केले. सुनिताराजे पवार यांनी आभार मानले. दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.