रेव्हरंड टिळकांचे ख्रिस्ती धर्मांतर हे त्याकाळातील कर्मठपणाविरुद्ध बंडच होते : डॉ. वंदना बोकील-कुलकर

पुणे : रेव्हरंड टिळकांचे ख्रिस्ती धर्मांतर हे त्याकाळातील कर्मठपणाविरुद्ध बंडच होते. असे मत साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी व्यक्त केले. निमित्त होते महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या का. र. मित्र व्याख्यानमालेचे. त्यांच्या व्याख्यानाचा विषय 'कवी रेव्हरंड टिळक : जीवन आणि काव्य' असा होता. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, कार्यवाह दीपक करंदीकर उपस्थित होते. रेव्हरंड नारायण वामन टिळक यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त डॉ वंदना बोकील -कुलकर्णी यांनी त्यांचे चरित्र आणि लेखन कर्तृत्व यांचा अभ्यासपूर्ण वेध घेतला. टिळकांचे कोकणातील बालपण, त्यांच्या आईचा मृत्यू, वडिलांच्या माराला कंटाळून घरातून पलायन, नाशिक येथे गणेशशास्त्री लेले यांचेकडे केलेले संस्कृत ग्रंथांचे अध्ययन, लक्ष्मीबाईंशी विवाह, नाशिक ते नागपूर भटकंती, ख्रिश्चन धर्माचा स्वीकार , समाजसेवा या सर्वांचा रसाळ आढावा त्यांनी घेतला.
'फुलामुलांचे कवी म्हणून ओळख असलेल्या टिळकांच्या "वनवासी फूल," "बापाचे अश्रू," "माझी भार्या," "केवढे हे क्रौर्य ! ", "पाखरा येशील का परतून ? "इत्यादी गाजलेल्या कवितांचा परामर्श त्यांनी घेतला. त्याचबरोबर धर्मांतर करूनही टिळकांनी भारतीयपण कसे जपले होते, अभंग , ओवी, आरती, फटका, श्लोक इत्यादी छंद त्यांनी कसे योजले ते बोकील यांनी उलगडून दाखवले. अभंगांजली "मध्ये भारतीय परंपरेतील साधकाच्या खुणा कशा दिसतात , त्याचेही साधार विवेचन केले . 'धर्मांतर म्हणजे देशांतर 'नव्हे हे आपल्या जगण्यातून सिद्ध केलेल्या या कवीच्या कार्यकर्तृत्वाचा समग्र परिचय त्यांच्या व्याख्यानातून घडला. प्रकाश पायगुडे यांनी प्रास्ताविक केले. सुनिताराजे पवार यांनी आभार मानले. दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.