सम्मेलनाच्या व्यासपीठानी गांधीजीना नेहमीच डावलले : अरुण खोरे

का. र. मित्र. व्याख्यानमालेचा समारोप
पुणे : वि. स.खांडेकर, साने गुरुजी, विनोबा, मर्ढेकर, माडखोलकर, वसंत बापट, पुल, गदिमा या सर्व लेखकांच्या साहित्यावर गांधी विचारांचा ठळक प्रभाव आहे. असे असतानाही गांधीजींच्या विचारांचा जागर करण्याची मानसिकता सम्मेलन आयोजकांकडे दिसली नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानेही त्याकडे दुर्लक्ष केले. सम्मेलनाच्या व्यासपीठांनी गांधीजींना नेहमीच डावलले अशी टीका ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित का. र. मित्र व्याख्यानमालेचा समारोप करताना ते बोलत होते. 'गांधीजींचे आत्मचरित्र : सत्याचे प्रयोग' हा त्यांचा व्याख्यानाचा विषय होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह दीपक करंदीकर यावेळी उपस्थित होते.
खोरे म्हणाले, 'गांधीजींचे मराठीतील पहिले चरित्र अवंतिकाबाई गोखले यांनी लिहिले. त्याला लोकमान्य टिळकांनी प्रस्तावना लिहिली. गांधीजींचे राजकीय गुरू नामदार गोखले, परात्पर गुरू न्या रानडे यांच्या संबंधीचा आत्मीय भाव गांधीजींनी आत्मचरित्रात व्यक्त केला आहे. पुणे आणि महाराष्ट्राशी असलेला त्यांचा ऋणानुबंध भारताचा विचार करता महत्वाचा आहे. तो त्यांनी आपुलकीने सांगितला आहे.'
प्रा. जोशी म्हणाले, 'आनंदासाठी निर्माण केलेली पंचतारांकित संस्कृती हा सामाजिक प्रमाद आहे असं गांधीजी सांगत. आज समाजाच्या नैतिक आणि भौतिक जीवनात निर्माण झालेली दरी कमी करण्यासाठी गांधी विचारांचा पुरस्कार करणे जरुरीचे आहे. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले. दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.'
