... आणि उलगडले जगसफरीचे रोमांचकारी अनुभव
परिषदेत रंगल्या 'मसाप गप्पा'

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना लंडन दाखविण्याचा आलेला योग... त्या बदल्यात त्यांनी सांगतिलेले शिवचरित्र .... तुम्ही जे सूक्ष्म तपशिलासह सांगत आहात ते लिहून काढा असा त्यांचा आग्रह... त्यातून लेखनास केलेला प्रारंभ... मौजच्या राम पटवर्धनांनी पहिल्याच पुस्तकासाठी अकरा वेळा करून घेतलेले पुर्नलेखन... त्यानंतर प्रकाशित झालेले पुस्तक... त्याला वाचकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद... अन डॉक्टरकी करताना प्रवासवर्णनाच्या लेखनाची सापडलेली लय... त्यातून आलेली वीस पुस्तके हा सारा प्रवास प्रसिद्ध लेखिका मीना प्रभू यांनी उलगडला. निमित्त होते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित मीना प्रभू यांच्याशी गप्पांच्या कार्यक्रमाचे. प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, कार्यवाह वि. दा. पिंगळे उपस्थित होते.या कार्यक्रमाला वाचकांनी प्रचंड गर्दी केली.
'मी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी. मला मराठी फारसे येत नव्हते. मनात न्यूनगंड होता आणि आजही कधी कधी जाणवतो, अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली. 'माझं लंडन', मेक्सिको पर्व, 'इजिप्तायन' 'ग्रीकांजली' अशा पुस्तकांमागील पर्यटनाची गाथा त्यांनी या वेळी उलगडली. लंडनमध्ये गेल्यानंतर वर्णभेदाचा करावा लागलेला सामना आणि त्याविषयीचे अनुभवही त्यांनी कथन केले. कुठल्याही देशात प्रवास करताना मी कॅमेरा वापरत नाही. दृश्य किंवा चित्र असेल त्यानं खोलवर जायचा प्रयत्न करते. एखाद्या मुस्लिम देशात जायचे असेल तर ईद, चीनमध्ये न्यू ईयर असे काही सणवार सुरु आहेत का ते पाहाते. कारण लोक त्याच दिवशी मोठ्या संख्येने बाहेर पडतात आणि मग सहज गर्दीत मिसळता येते मी त्या देशातील भाषा, प्रार्थना, भोजन वेशभूषा आणि संस्कृती समजून घेण्यावर अधिक भर देते. तुम्ही त्यांच्या गर्दीतले असलात तर अनुभव अधिक गाठीशी येतात, असेही त्या म्हणाल्या.
अंदमान हा आत्मा आणि बुद्धीचा प्रवास आहे. तिथल्या सेल्युलर जेलमध्ये गेल्यानंतरच कळतं, की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय काय हालअपेष्टा सहन केल्या असतील? कुठल्याही राजकीय कैद्याला इतक्या यातना सहन कराव्या लागल्या नसतील. सावरकरांची तिथे दहा-बाय-सातची एक अरुंद खोली होती. या खोलीबाहेरील कठड्याखाली त्यांच्या सहकाऱ्यांना फाशी दिली जायची आणि तेव्हा सावरकरांना जाणीवपूर्वक त्या कठड्यापाशी त्याच वेळी उभे केले जायचे, अशा शब्दांत प्रसिद्ध लेखिका मीना प्रभू यांनी अंदमानच्या जेलमध्ये सावरकरांनी भोगलेल्या यातना शब्धबद्ध करताना उपस्थितांच्या अंगावर काटा उभा राहिला.
एक माणूस आपल्या राष्ट्रासाठी काय अर्पण करतो, हे तिथे गेल्याशिवाय कळू शकत नाही. इतक्या हालअपेष्ठा सहन करूनही सावरकरांना तिथे लेखन स्फुरते, हे नक्कीच दैवी आणि अद्वितीय आहे. त्यामुळे आज शपथ घेतली पाहिजे की, 'मी एकदा तरी अंदमानला जाईन.'
प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले. वि. दा. पिंगळे यांनी आभार आणि सूत्रसंचालन केले.


