योग ही आंतरिक परिवर्तनाची प्रक्रिया : डॉ. संप्रसाद विनोद
साहित्य परिषदेत स्वामी स्वरूपानंद स्मृती व्याख्यान

पुणे : आपण सारे बाहेरच्या जगात अडकून पडलो आहोत. मन:शक्ती, आरोग्य आणि तणावातून मुक्ती या गोष्टीच केवळ योगामुळे साध्य होतात असे नाही तर योगामुळे आंतरिक परिवर्तन घडते. योग ही आंतरिक परिवर्तनाची प्रक्रिया आहे, असे मत प्रसिद्ध योगगुरू डॉ. संप्रसाद विनोद यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेत स्वामी स्वरूपानंद स्मृती व्याख्यान देताना ते बोलत होते. ‘योगविद्येचे अंतरंग’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह दीपक करंदीकर उपस्थित होते.
डॉ. विनोद म्हणाले, ‘योगात ध्यान, ध्यानमयी योगासने आणि ध्यानमयी जगणं अपेक्षित आहे. शरीर, मन, बुद्धी,भावना आणि आत्मा यांच्यातील गतिशील संतुलन अनुभूतीने जाणण्याची उत्सुकता हवी. आंतरिक परिवर्तनामुळे दृष्टी बदलते दृष्टी बदलली की सृष्टी बदलते. योगासनांमुळे शरीराची लवचिकता वाढते. ध्यानामुळे मनाची लवचिकता वाढते. विशुद्ध असणे म्हणजेच कैवल्य. सहजता हा योगाचा आत्मा आहे. आपले आंतरविश्व रोचक आहे ते समजून घेण्यासाठी योग उपयुक्त आहे.’
प्रा. जोशी म्हणाले, ‘भारत ही योगभूमी आहे. व्यक्तीच्या ठायी असणारे आत्मतत्त्व आणि विश्वाच्या ठायी असणारे परमतत्व यांच्यात एकरुपता अनुभवणे म्हणजे योग. योगाकडे केवळ व्यायाम प्रकार म्हणून पाहता येणार नाही. योग् ही जीवनशैली आहे. एकांत आणि एकाग्रता ही मूल्ये आहेत ती आज हद्दपार झाली आहेत. बाहेरचा गोंगाट वाढल्यामुळे माणसांना अंतर्नाद ऐकायला येत नाही तो ऐकण्यासाठी योग उपयुक्त आहे. दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले.