स्त्रीमुक्तीचीच नव्हे, तर मानवतावादाची हानी
मसापतर्फे विद्या बाळ यांना आदरांजली

पुणे : स्त्रीमुक्ती, स्त्रीवादाकडे कायम अप्रिय विषय म्हणून पहिले गेले आहे. विद्याताई बाळ आयुष्यभर या अप्रिय विषयाचा पाठलाग करत राहिल्या. एकाकी स्त्रियांचा त्या आधारवड आणि पुरुषसत्ताक मानसिकतेसाठी नेत्रांजन ठरल्या. त्यांच्या जाण्याने केवळ स्त्रीमुक्तीचीच नव्हे तर मानवतावादी चळवळीचीही अपरिमित हानी झाली आहे, अशा शब्दात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांना आदरांजली वाहण्यात आली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे विद्या बाळ यांना आदरांजली वाहण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार यावेळी उपस्थित होत्या.
डॉ. रेखा इनामदार साने म्हणाल्या, 'विद्याताई गावोगावी जाऊन लोकांना भेटायच्या. स्त्रीमुक्तीची चळवळ त्या शब्दशः जगल्या. सहजीवन, सहचर, माणूसपण या शब्दांची धार त्यांनी समाजाला दाखवून दिली. आगरकरांचा स्त्री रूपातील अवतार म्हणजे विद्याताई. आजही स्त्रीवर अत्याचार होतात, हे लांछनास्पद आहे. स्त्री स्वातंत्र्यासाठी ज्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले, त्यांचे स्मरण आपण ठेवले पाहिजे. अनेकदा चळवळीचे नेतृत्व करणारी व्यक्ती स्वतःच्या प्रेमात आकंठ बुडालेली असते. त्यामुळे अनुयायी मागेच राहतात. विद्याताईंनी मात्र कायम सामान्यत्व जपले. त्यांच्या आचार, विचारात सुसंगती होती. सकारात्मकता, सहृदयता, सजगता असे गुण त्यांच्या ठायी होते.'
मंगला गोडबोले म्हणाल्या, 'प्रत्येकाच्या जगण्याच्या पद्धतीचा त्यांनी आदर केला. स्त्री मासिक बंद पडले, मात्र त्या खचल्या नाहीत. कोणताही पाठिंबा नसताना त्यांनी मोठ्या धीराने 'मिळून साऱ्याजणी' मासिक सुरु केले. त्यांचा पिंड कार्यकर्तीचा होता. स्त्रीमुक्ती हा विचार अनेकांना अप्रिय वाटायचा आणि वाटतो. तरीही या विचारांचा त्यांनी सातत्याने, संयमाने पाठपुरावा केला. त्यांनी कायम अप्रियता झेलली. सहृदयतेने त्यांनी प्रत्येक स्त्रीचे दुःख समजून घेतले.'
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, विद्याताईंच्या निधनाने मानवमुक्तीच्या लढ्याची हानी झाली आहे. त्यांची संवादी वृत्ती, विचारांची स्पष्टता सर्वांनाच भावली. त्यांनी चळवळीला कायम बळ दिले आणि साहित्य निर्मितीला ऊर्जा दिली. त्यांचा लढा 'मिळून साऱ्याजणांनी' पुढे न्यायला हवा.' डॉ. बाबा आढाव म्हणाले, 'बदलत्या काळानुसार विद्याताई बदलत राहिल्या. त्या त्या काळातील महिलांची दुःखे त्या जाणून घेत होत्या. त्या पत्नी, आई, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्याही होत्या. त्यांनी स्त्रियांना अत्याचारांपासून दूर सारण्यासाठी आयुष्य वेचले. मात्र त्या गेल्यानंतर दोन दिवसांत तीन महिलांना जिवंत जाळल्याचा घटना घडल्या. त्यामुळे ज्या सांस्कृतिक विचारांवर समाज चालतो, ते सर्व निकष तपासून पाहण्याची गरज आहे. तीच विद्याताईंना खरी श्रद्धांजली ठरेल.
