अभिवाचनातून उलगडला गौरवशाली शिवकाल
मसाप आणि एकपात्री कलाकार परिषद आयोजित ‘लेखक एक-आविष्कार अनेक’ या उपक्रमाचे उद्घाटन

पुणे : प्रसिद्ध लेखक ऋषिकेश परांजपे यांनी त्यांच्या 'रक्तात रंगली शौर्यकथा' या दीर्घ कथानकाचे केलेले अभिवाचन... कसदार लेखन... तितक्याच ताकदीने केलेले अभिवाचन... त्यातून उभा राहिलेला गौरवशाली शिवकाल... आणि तो ऐकताना रसिक श्रोते छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या भेटीच्या प्रसंगात रमले. अंगावर रोमांच उभा करणारा प्रसंग ऐकताना परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह स्तब्ध झाले होते. निमित्त होते महाराष्ट्र साहित्य परिषद आणि एकपात्री कलाकार परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'लेखक एक आविष्कार अनेक' या उपक्रमाच्या उद्घाटनाचे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, एकपात्री कलाकार परिषदेचे अध्यक्ष दिलीप हल्ल्याळ, दीपक रेगे उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रा. जोशी म्हणाले, अन्नामुळे माणसांच्या शरीराचे भरण पोषण होते. कलांमुळे त्यांच्या रसिकतेचे भरण पोषण होते. समाजाची सांस्कृतिक समृद्धी वाढविण्यासाठी रसिकत्वाचे पोषण होणे ही तितकेच महत्वाचे आहे. नाटक असो वा चित्रपट कसदार साहित्य असल्या शिवाय उत्तम निर्मिती होऊ शकत नाही. त्यासाठी साहित्याचा पाया मजबूत असणे महत्त्वाचे आहे. सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आपापल्या कोषात काम करीत आहेत. त्यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. साहित्य परिषदेने त्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. अनेक संस्थांच्या सहकार्याने कार्यक्रम घेतले आहेत. 'लेखक एक आविष्कार अनेक' या कार्यक्रमात दर महिन्याला एका नाटककाराच्या नाट्यकृतीचे अभिवाचन केले जाणार आहे. हल्याळ म्हणाले, 'या उपक्रमाच्या निमित्ताने साहित्य परिषदेबरोबर जोडले जात आहोत याचे समाधान आहे. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले. नरेंद्र लवाटे यांनी सूत्रसंचालन केले.