२७ फेब्रुवारीला साहित्य परिषदेतर्फे वाङमय पुरस्काराचे वितरण

पुणे - महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी मराठी भाषा दिनानिमित्त २७ फेब्रुवारीला विशेष वाड्मय पुरस्कार प्रदान केले जातात. यावर्षीच्या कॉन्टिनेन्टल पुरस्कृत चिं. वि. जोशी पुरस्कारासाठी डॉ. सुमन नवलकर (मुंबई) यांच्या 'मस्त झकास अफाट इ. इ.' या विनोदी कथासंग्रहाची, कै. द. वा. पोतदार पुरस्कारासाठी विनायक व विशाखा अभ्यंकर यांच्या 'झेप रणभूमीवर' या ऐतिहासिक ग्रंथाची, कै. शं. ना. जोशी पुरस्कारासाठी डॉ. राधिका टिपरे यांच्या 'अजिंठा' या ग्रंथाची, कै. विद्याधर पुंडलिक पुरस्कारासाठी अनघा केसकर यांच्या 'वाटा' या कथासंग्रहाची, कै. सुहासिनी इर्लेकर स्मृती पुरस्कारासाठी विनय पाटील (मुंबई) यांच्या 'आदितृष्णा' या कवितासंग्रहाची,कवी यशवंत पुरस्कारासाठी नीतीन मोरे यांच्या 'गात्र गात्र रात्र' या काव्यसंग्रहाची आणि रा. श्री. जोग पुरस्कारासाठी डॉ. शुभांगी पातुरकर यांच्या 'छंदोमीमांसा' या समीक्षा ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. गुरुवार दि. २७ फेब्रुवारी २०२० रोजी मराठी भाषा दिनी सुप्रसिद्ध साहित्यिक भारत सासणे यांच्या शुभहस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आहेत. हा समारंभ सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. अशी माहिती मसापचे कार्यवाह बंडा जोशी यांनी दिली.