वैचारिक प्रगतीसाठी समृद्ध पत्रकारितेची आवश्यकता : डॉ. श्रीपाल सबनीस
साहित्य परिषदेत जांभेकर स्मृती व्याख्यान

पुणे : महाराष्ट्रामध्ये उपेक्षा करुन मारणं ही लोकांची एक फार आवडती कला आहे. हीच उपेक्षा बाळशास्त्री जांभेकरांच्याही नशिबी आली. जांभेकरांचं कर्तृत्त्व महाराष्ट्रातल्या कानाकोपर्यातल्या मातीच्या शेवटच्या कणापर्यंत आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहचवणं आवश्यक आहे. बाळशास्त्रींच्या विचारांची सूत्रं महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहचली तर आधुनिक काळातली रसिकता, वाचनसंस्कृती ही सत्याच्या बाजूने झुकेल. लेखण्या विकलेल्या देशाला कुठलंही भविष्य नसतं. लेखणीचं पावित्र्य आणि लेखणीचं पातिव्रत्य शिल्लक ठेवायचं असेल तर जांभेकरांनी सुरु केलेली ही समृद्ध पत्रकारिता जी प्रामाणिक मतभेद व्यक्त करते ती सुरु ठेवली पाहिजे. असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ.श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे व महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात प्रथमच ‘बाळशास्त्री जांभेकरांची पत्रकारिता’ या विषयावर मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित व्याख्यानात डॉ.सबनीस बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी मसाप पुणेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे होते तर महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
डॉ. सबनीस पुढे म्हणाले, 'बाळशास्त्री जांभेकर हे एका कर्तृत्त्वाचे नाव आहे. आणि या कर्तृत्त्वाचा संबंध मराठी पत्रकारितेशी जोडलेला आहे. आपल्याकडे पहिलेपणाबद्दल प्रचंड वाद आहेत. पण मराठी वृत्तपत्रांच्या बाबतीत असं काही आहे का? याचा विचार केला तर बाळशास्त्री जांभेकरांच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये मराठीतले एकही वृत्तपत्र नाही. असं हे पहिलेपण आहे. इंग्रजांची नोकरी करत असताना गुलामीचे समर्थन न करणार्या बाळशास्त्री जांभेकरांनी धर्मशास्त्राला आव्हान दिलेले नाही. पण त्याची चिकित्सा केली. त्यांना वैज्ञानिकदृष्टी होती. जनकर्तव्याची भूमिका एखाद्या संपादकाची असेल तर त्या संपादकाच्या संपादनाखाली चालणार्या वृत्तपत्रामध्ये निश्चित लोककल्याणकारी लेखन केलं जातं. अंधश्रद्धेपासून मुक्तता हे एक जांभेकरांच्या भूमिकेचे वैशिष्ठ्य होते. उदार भूमिकेचा स्विकार करणारे ते संपादक होते.
वैचारिक मतभेदासाठी टोकाची भांडणे जरुर करा पण सत्य दाबण्यासाठी आणि सत्तेचा माज शिल्लक ठेवण्यासाठी पत्रकाराला वापरणं अशी पत्रकारिता महाराष्ट्राला परवडणारी नाही. म्हणून पत्रकारांची भूमिका शुद्ध, पवित्र होईपर्यंत ही कार्यपालिका आणि कायदेमंडळ सुधारणार नाहीत. पत्रकारांचा वचक असावा. असे पत्रकारच नसतील तर महाराष्ट्र करंटा ठरेल.
यावेळी बोलताना महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ म्हणाले, 'ब्रिटीशांच्या काळातील मुंबईतील मराठी समाजाला इंग्रजी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी बाळशास्त्रींना प्रथम प्रयत्न करावे लागले. या माध्यमातून त्यांनी शिक्षण, समाजकारण, इतिहास संशोधन, पुरातत्त्व संशोधन, गणित, विज्ञान, भूगोल आदी विषयातील पाश्चात्यांचं ज्ञान आपल्या मुलांना देण्यासाठी शालेय क्रमिक पुस्तके लिहिली. याचवेळेस राजाराम मोहन रॉय पश्चिम बंगालमध्ये करीत असलेल्या स्त्रीयांविषयक व सामाजिक सुधारणा महाराष्ट्रात आणण्यासाठी त्यांनी ‘दर्पण’ वृत्तपत्राची सुरुवात केली. बाळशास्त्रींच्या पत्रकारितेचा पाया हा शिक्षण, संशोधन व जनसामान्यांच्या प्रश्नाकडे सामान्यांचे लक्ष वेधणे हा होता. आजच्या पत्रकारांनी हा पाया लक्षात ठेवला तर अनेक अर्थाने मराठी वृत्तपत्रसृष्टी समृद्ध होईल.'
अध्यक्षीय भाषणात प्रकाश पायगुडे म्हणाले, 'बाळशास्त्री जांभेकर हे बहुआयामी पत्रकार होते. त्यांनी भूगोल, संस्कृत, गणित, इतिहास अशा विविध विषयांचा अभ्यास केला. याव्यतिरिक्त त्यांचं चार भाषांवर प्रभुत्व होतं. त्यांना सहा परदेशी भाषा येत होत्या. एशियाटिक लायब्ररीच्या त्रैमासिकात लिहिणारे ते पहिले भारतीय होते. कुलाबा वेधशाळेत त्यांनी आपले योगदान दिले आहे. गणितशास्त्रात संशोधन केले आहे. लोकांना वैज्ञानिक दृष्टीकोन यावा यासाठी त्यांनी पत्रकारिता केली.' कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे विश्वस्त अमर शेंडे यांनी केले.