साहित्य परिषदेत चिमुकल्यांचा चिवचिवाट
मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला हस्ताक्षर-अभिवाचन स्पर्धेचे पारितोषिक वितरण

पुणे, दि. २६ (प्रतिनिधी) : एरवी वैचारिक विषयांवरील व्याख्याने, परिसंवाद, कविसंमेलन अशा कार्यक्रमांनी गजबजणाऱ्या परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आज मात्र चिमुकल्यांचा चिवचिवाट होता. निमित्त होते, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि ‘शब्दसारथी’ यांच्या वतीने मराठी भाषा दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या हस्ताक्षर-अभिवाचन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे!
पुणे शहर व परिसरातील विविध शाळांतील ४०० हून अधिक मुलांचा उस्फूर्त प्रतिसाद या स्पर्धांना मिळाला. या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना या वेळी पदके देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, लिज्जत महिला गृहउद्योग प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश कोते, ‘शब्दसारथी’चे संचालक पराग पोतदार, थिंक पॉझिटिव्हचे संपादक प्रभाकर भोसले, आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग असणा-या ज्ञानप्रबोधिनी (निगडी), हेरिटेज स्कूल व डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतील शिक्षिकांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
या वेळी प्रा. जोशी म्हणाले, ‘‘आपली मराठी भाषा ही आपल्या आईची भाषा आहे. आईवर जसे प्रेम करता तसे आपल्या मराठी भाषेवर प्रेम करा. आपल्या भाषेचा अभिमान बाळगा. एकमेकांशी बोलताना मराठीतच बोला. आपल्या भाषेत सुंदर साहित्याची खाण आहे. खूप वाचा. पुस्तकाचे पंख लावून भरारी घ्या.’’
परिक्षकांच्या वतीने आनंद सराफ व मधुरा कोरान्ने यांनी मनोगत व्यक्त केले. प्रभाकर भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले. शब्दसारथीचे संचालक पराग पोतदार यांनी प्रास्ताविक केले. सुनिताराजे पवार आणि प्रकाश पायगुडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रियांका शेजाळे हीने सूत्रसंचालन केले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : अभिवाचन स्पर्धा - पहिली ते चौथी : प्रथम क्रमांक (विभागून) : ओवी कुलकर्णी, श्याल्मली घोलप, द्वितीय क्रमांक : सनथ देशपांडे, तृतीय क्रमांक : अरण्या जगताप. पाचवी ते सातवी : प्रथम क्रमांक - गौरी पेठकर, द्वितीय क्रमांक (विभागून) : ओजस्वी पवार, अभिषेक अलुरकर, प्रज्ञा देशपांडे, तृतीय क्रमांक : अस्मी वैद्य. आठवी ते दहावी, प्रथम क्रमांक पार्थ शिंदे
हस्ताक्षर स्पर्धा : पहिली ते चौथी : प्रथम क्रमांक - प्रचिती पाटील, द्वितीय - आयुष चोंधे, तृतीय - श्याल्मली घोलप. पाचवी ते सातवी : प्रथम क्रमांक - अस्मी वैद्य, द्वितीय - आदित्य येळे, तृतीय - सानिका गडे, आठवी ते दहावी : प्रथम क्रमांक - राज्ञी सोनावणे, द्वितीय - स्वरा पांगारे, तृतीय - कुबल प्रणव.
चौकट
कोल्हापूर, मुंबईतूनही विद्यार्थ्यांचा सहभाग
या स्पर्धेत विशेष मुलांचाही सहभाग उल्लेखनीय होता. पुण्यातील फिनिक्स स्कूलमधील दिव्यांग मुले यात सहभागी झालेली होती. तसेच कोल्हापूर, मुंबई या शहरांतूनही मुले उत्साहाने सहभागी झालेली होती.
चौकट
‘विशेष’ म्हणून नको, गुणवत्ता पहा!
सनथ देशपांडे या अंध मुलाने स्मार्ट ब्रेल या मशीनच्या सहाय्याने मराठीतून उत्तम अभिवाचन केले. त्याच्या आईने मात्र विनंती केली की माझा मुलगा दृष्टिहिन आहे म्हणून ‘विशेष’ समजून त्याला सन्मानित करू नका. त्याला इतरांसारखाच नॉर्मल असू द्या. त्याच्या गुणवत्तेने त्याचा क्रमांक आला व परिक्षकांनी निवड केली तरच त्याचा सत्कार करा. विशेष म्हणजे गुणवत्तेच्या बळावरच सनथ या स्पर्धेत विजेता ठरला.