मसापमध्ये गीतांतून सावरकरांना अभिवादन

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त सावरकरांच्या जीवनावर आधारित 'अग्निपूजा' या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार कै. अरविंद लेले यांनी परिषदेला दिलेल्या देणगीतून स्मृतिदिनाचा कार्यक्रम करण्यात येतो. लेखन आणि निवेदन विश्वास गांगुर्डे यांचे होते, गायन श्रीपाद भावे, आनंद भीमसेन जोशी, ईश्वरी महाबळेश्वरकर, भगवान धेंडे, रमेश वैद्य यांनी केले. तबल्यावर साथ घनश्याम कुलकर्णी यांनी बासरीची साथ रमेश मुलाणी, यांनी आणि सिंथेसाइझरची साथ विवेक म्हसवडे यांनी केली. यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कार्यवाह दीपक करंदीकर, हेमंत लेले, लेखिका मीना प्रभू उपस्थित होते.
प्रा. जोशी म्हणाले, 'स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील धगधगते अग्निकुंड होते. चाफेकरांच्या चितेतून निर्माण झालेले वादळ सावरकरांच्या आयुष्यात घोंगावत राहिले. स्वातंत्र्यनिष्ठा, हिंदुत्वनिष्ठा, साहित्यनिष्ठा आणि विज्ञाननिष्ठा या चार निष्ठांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले.