मसाप ब्लॉग  

लेखकाने भयमुक्त होऊन लेखननिर्मिती करावी : भारत सासणे

February 27, 2020

मराठी भाषा दिनानिमित्त मसापच्या विविध पुरस्कारांचे वितरण

 

 

 

पुणे : आता सर्वाधिक द्वेषाचा काळ आलेला आहे. विवेकशून्यतेच्या दिशेने समाजाचा प्रवासदेखील सुरु आहे. एका विनाशाकडे, विद्वेषाकडे, गृहयुद्धाच्या कालखंडाकडे आपण वाटचाल करतो आहोत. कोलाहलामध्ये नेहमीच क्षीण असलेला विवेकाचा आवाज लेखकाने ऐकला पाहिजे व त्याअनुषंगाने भयमुक्त होऊन लेखननिर्मिती केली पाहिजे. यामध्येच समाजहित दडलेले आहे. असे मत भारत सासणे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी मराठी भाषा दिनानिमित्त विशेष  वाड्मय पुरस्कार प्रदान केले जातात. डॉ. सुमन नवलकर, विनायक व विशाखा अभ्यंकर, डॉ. राधिका टिपरे, अनघा केसकर, विनय पाटील, नीतीन मोरे आणि डॉ. शुभांगी पातुरकर या लेखकांना भारत सासणे यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी होते यावेळी प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार आणि कार्यवाह बंडा जोशी उपस्थित होते.

सासणे म्हणाले, 'आपण आता 'भ्रमयुगा'मध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. सत्य ही मनाची ग्वाही असताना त्याऐवजी अनेकांनी दिलेले प्रशस्तीपत्र सत्य सिद्ध करण्यासाठी वापरले जात असल्यामुळे आपण गोंधळून गेलेलो आहोत. सत्यान्वेष ही लेखकाची प्रतिज्ञा असते त्यामुळे लेखकाने सत्याचा अन्वेष केलाच पाहिजे. परंतु त्याच बरोबरीने लेखकाला सामान्य माणसांच्या छोट्या-छोट्या लढायादेखील लढाव्या लागतात. सामान्य माणसांच्या सामान्य अशा जीवनातील असामान्य अशी सुखदुःखे सहकंपित होऊन मनोमनी स्वीकारून आपल्या लेखनामधून या लढाया पुढे नेण्याचे काम लेखकाला करावे लागेल.

प्रा. जोशी म्हणाले, 'लेखकांनी आत्ममग्न असावे पण आत्मकेंद्री असू नये. लेखकाची वृत्ती समाजमनस्क नसेल तर त्याचे लेखन हा केवळ त्याचा छंद ठरेल. साहित्य आणि समाज यांचा संबंध केवळ लेखक आणि वाचक इतकाच मर्यादित नसतो त्यापुढे जाऊन लेखकाने समाजहितासाठी भूमिका घेणे महत्त्वाचे आहे. लेखनासाठी अंतर्मुख वृत्ती आणि समाजमनाची स्पंदने टिपण्यासाठी बहिर्मुख वृत्तीही लेखकाकडे असायला हवी.

प्रकाश पायगुडे यांनी प्रास्ताविक केले. सुनिताराजे पवार यांनी आभार मानले. बंडा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive