मनातून सगळेच जातीयवादी आहेत - म. भा. चव्हाण

पुणे : कवितेला धर्म नसतो. कवितेला जात नसते. कविता फक्त संवेदना असते. गझलकार सुरेश भट कुणाचे गुरु नाहीत. त्यांचा कोणीही शिष्य नाही. सुरेश भट कलंदर प्रतिभावंत होते. मानवतेचे कैवारी होते. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तुलना करणे चुकीचे आहे. दोन्ही महामानव श्रेष्ठ होते. एक स्वातंत्र्यासाठी लढले दुसरे जातिअंतासाठी. गांधी आणि आंबेडकरांची निर्भयता लाख मोलाची आहे. कविता आणि गझल यात भेद करू नये. गझल हा कवितेचाच एक प्रकार आहे. कवितेला सत्याचे अधिष्ठान असले पाहिजे. सध्या सत्य हरवत आहे. म्हणूनच या देशात समता वणवण फिरते आहे. धर्मभेद, जातीभेद घातक आहे. मनातून सगळेच जातीयवादी आहेत. असे मत प्रसिद्ध कवी म. भा. चव्हाण यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या एक कवी एक कवयित्री या कार्यक्रमात ते बोलत होते. म. भा. चव्हाण आणि पदमरेखा धनकर यांच्याशी कवी उद्धव कानडे आणि प्रमोद आडकर यांनी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि सुनिताराजे पवार उपस्थित होत्या. 'ती चाफ्याचे झाड', 'हा धर्म ग्रंथ', 'चंगेजखान', 'आदेश बदलला आहे', 'ते नाव बापूंचे' आणि 'आई' या कविता प्रसिद्ध कवी म. भा. चव्हाण यांनी सादर केल्या.

डॉ. पदमरेखा धनकर म्हणाल्या, 'कवितेची वाट अवघडच असते. लेखनाचा प्रारंभ कवितेनेच होतो. कवितेचे आकलन होते तेव्हा ती अवघड होते. कवितेला मूर्ती समजून तिच्याकडे पाहिले तर मला आतापर्यंत तिची नखंच दिसली. अजून मूर्ती दिसली नाही. कविता वाळूसारखी असते ती मुठीत येत नाही. कवितेच्या अवघड वाटेवरून चालणेच आनंदाचे असते. नव्वदपूर्व काळातील स्त्री कवयित्रींनी स्त्रीवादी कवितेची वाट मोकळी केली. स्त्रीच नाहीतर इथली प्रत्येक व्यक्ती व्यवस्थेच्या तालावर नाचते आहे. खरी कविता काळाच्या कसोटीवर टिकून राहते. समीक्षक हा कवितेचा वाटाड्या आहे. खाचखळगे दूर करून चांगली वाट दाखवतो. अभिरुची हरवलेली नाही. कविताही हरवलेली नाही. 'मधुचंद्र', 'गलका झाला की', 'फक्त सैल झालाय दोर', 'कच्ची लिंब', 'स्माईल', 'संपवता येणार नाही कवी' यांनी या कविता पदमरेखा धनकर यांनी सादर केल्या. प्रास्ताविक मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले. सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.
