विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी अशोक नायगावकर
२७ आणि २८ मार्चला फलटणला होणार संमेलन

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय साहित्य संमेलन २७ आणि २८ मार्च रोजी फलटण जि. सातारा येथे होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या फलटण शाखेने या संमेलनाचे आयोजन केले आहे. प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. स्वागताध्यक्षपदी सदगुरू हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांची तर कार्याध्यक्षपदी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सचिव सचिन सूर्यवंशी (बेडके) यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
प्रा. जोशी म्हणाले, 'फलटणच्या महाराजा मंगल कार्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या संमेलनाचा प्रारंभ ग्रंथदिंडीने होणार आहे. संमेलनाच्या प्रवेशद्वाराला श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचे नाव तर व्यासपीठाला ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे नाव देण्यात आले आहे. उदघाटन समारंभात सातारा जिल्ह्यात गेली अनेक वर्षे विविध साहित्य संमेलने आयोजित करणाऱ्या आयोजकांचा सत्कार करण्यात येणार आहे. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली हीरकमहोत्सवी 'महाराष्ट्र : आघाडीवर की पिछाडीवर?' या विषयावर परिसंवाद होणार असून त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, किशोर बेडकिहाळ, डॉ. वैभव ढमाळ सहभागी होणार आहेत. 'प्रसारमाध्यमे व साहित्यिक समाजप्रबोधनात कमी पडत आहेत का?' या विषयावरील परिसंवाद विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून त्यात हरीश पाटणे, युवराज पाटील सहभागी होणार आहेत. निमंत्रितांचे कविसंमेलन प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेचे लेखक प्रताप गंगावणे यांची प्रकट मुलाखत होणार असून कथाकथन, स्थानिकांचे कविसंमेलन असे कार्यक्रम या संमेलनात होणार आहेत. समारोपाच्या कार्यक्रमात समाजाच्या विविध क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करून सातारा जिल्ह्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या नामवंतांचा सन्मान करण्यात येणार आहे.