पूर्णवेळ लेखक ही उत्तम करिअर संधी - प्रा. मिलिंद जोशी

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि साहित्य सेतू यांनी संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या लेखन कार्यशाळां मालिकेच्या उदघाटन प्रसंगी मसाप पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी पूर्णवेळ लेखक ही उत्तम करिअर संधी आहे असे प्रतिपादन केले. "यशस्वी व्यावसायिक लेखक बना" ही पहिली रविवार ८ मार्च रोजी संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, नाशिक, जळगाव, चिपळूण तसेच मुंबई विभागातून मोठ्या प्रमाणावर नवोदित लेखकांनी सहभाग नोंदवला. या कार्यशाळेमध्ये शिवराज गोर्ले, अतुल कहाते, भालचंद्र कुलकर्णी, अॅड. कल्याणी पाठक, अनिल कुलकर्णी व प्रा. क्षितिज पाटुकले यांनी मार्गदर्शन केले. शिवराज गोर्ले यांनी यशस्वी लेखन कसे बनावे या विषयावर मार्गदर्शन केले. अतुल कहाते यांनी साहित्यिक जडणघडण, विषयांची निवड, अभ्यास व लेखनाची शिस्त या विषयांवर मार्गदर्शन केले. प्रकाशक अनिल कुलकर्णी यांनी पुस्तक प्रकाशन प्रक्रिया, लेखक-प्रकाशक करार, संपादन, मुखपृष्ठ निर्मिती या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. भालचंद्र कुलकर्णी यांनी आय.एस.बी.एन नोंदणी प्रकिया या विषयावर तर ऍड. कल्याणी पाठक यांनी कॉपीराईट या महत्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. क्षितिज पाटुकले यांनी मराठी लेखकांना आवश्यक असणारी व्यावसायिक सजगता, संधी, लेखकाचे डिजिटल व्यक्तिमत्व या विषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत मराठी काका अनिल गोरे यांचे 'मराठी भाषाभिमान' या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेतून एकाच ठिकाणी बहुतेक माहिती मिळाली आणि अनेक शंकाकुशंकांचे निरसन झाले अशी भावना सहभागी नवोदित लेखकांनी व्यक्त केली.