संत मीराबाई करुणेचा सागर : डॉ. राधा मंगेशकर

पुणे : करुणा म्हणजे दया नव्हे. करुणा म्हणजे दुसऱ्याच्या सुखदःदुखाशी समरस होणे. संत मीराबाईना समजून घेण्यासाठी ती करुणा आपल्या ठायी असणे गरजेचे आहे. संत मीराबाई या करुणेचा सागर आहेत. असे मत प्रसिद्ध गायिका डॉ. राधा मंगेशकर यांनी व्यक्त केले. महिलादिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र साहित्य परिषदेत आयोजित कार्यक्रमात 'मीरा समजून घेताना' या विषयावर त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, कवयित्री अश्विनी धोंगडे उपस्थित होते.
डॉ. मंगेशकर म्हणाल्या, 'संत मीराबाईचे चरित्र त्यांच्या पदामधून उलगडते. काळाला न पेलणारे धैर्य त्यांच्याकडे होते. बालवयात झालेला विवाह, विवाहानंतर तीनच वर्षात आलेले वैधव्य आणि त्यानंतर त्यांचे कृष्णभक्तीत तल्लीन होणे हे सारेच त्यांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडविणारे ठरले. 'पहिली मुक्त स्त्री' असाच त्यांचा उल्लेख करावा लागेल. आपल्या ठामपणाची मोठी किंमतही त्यांना त्या काळात मोजावी लागली. त्यांना सत्तर वर्षाचे आयुष्य लाभले. तो मोठा कालखंड कर्मठ समाज असतानाही त्यांनी कसा घालविला हे आजच्या काळात समजून घेतले तर त्यांचे मोठेपण आणि द्रष्टेपण लक्षात येईल. इतिहास लेखन ज्या गांभीर्याने करायला पाहिजे ते गांभीर्य दिसत नाही. आकर्षण, जिज्ञासा आणि संशय यामुळेच व्यक्तीच्या कार्याचे मूल्यमापन तटस्थपणे करता येते.
प्रकाश पायगुडे यांनी प्रास्ताविक केले. सुनिताराजे पवार यांनी आभार मानले. उद्धव कानडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.