
स्पर्धा
महाराष्ट्र साहित्य परिषद आयोजित विविध साहित्य विषयक स्पर्धा
मिरासदारांच्या नव्वदीनिमित्त 'मसाप' आणि मिरासदार प्रतिष्ठान यांच्या वतीने विनोदी कथालेखन स्पर्धा
आपल्या समृद्ध, संपन्न आणि शालीन विनोदाने मराठी साहित्याचे दालन श्रीमंत करणारे ज्येष्ठ विनोदी साहित्यिक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा. द. मा. मिरासदार यांच्या नव्वदीनिमित्त साहित्य परिषदेने आणि मिरासदार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने विनोदी कथालेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे.
शालेय गट (५ वी ते १० वी), महाविद्यालयीन गट (११ वी ते पदव्युत्तर पदवी) आणि खुला गट अशा तीन गटात ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. इच्छुकांनी आपल्या कथा कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता, पुणे ४११०३० या पत्त्यावर टपालाद्वारे अथवा masaparishad@gmail.com या पत्त्यावर मेलद्वारे ३० सप्टेंबरपर्यंत पाठवायच्या आहेत. प्रत्येक गटात तीन पारितोषिके दिली जाणार असून उत्तेजनार्थ कथांचाही सन्मान केला जाणार आहे.
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण 'मिरासदारी'-९० विनोद परंपरा महोत्सवात एका विशेष कार्यक्रमात करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि मिरासदार प्रतिष्ठानच्या सुनेत्रा मंकणी यांनी दिली.
प्रा. जोशी म्हणाले, प्रा. द. मा. मिरासदार आणि साहित्य परिषद यांचा गेल्या साठ वर्षांचा स्नेहानुबंध आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या नव्वदीनिमित्त त्यांच्या लेखन कर्तृत्वाला अभिवादन करण्यासाठी परिषदेने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. "विनोदी साहित्याला आजही प्रचंड मागणी आहे. उत्तम विनोदी कथा लेखन दुर्मिळ झाले आहे. चांगला विनोद निर्माण होत असला तरी तो प्रसिद्ध होताना दिसत नाही. नव्या पिढीतील कसदार विनोदी कथा लेखन करणाऱ्या प्रतिभावान कथाकारांचा शोध घेणे आणि त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा स्पर्धेच्या आयोजनामागचा परिषदेचा मुख्य हेतू आहे."
सुनेत्रा मंकणी म्हणाल्या, "द. मा. मिरासदारांच्या नव्वदीनिमित्त 'मिरासदारी ९० - विनोद परंपरा महोत्सवांतंर्गत विविध संस्थांच्या सहकार्याने वर्षभर अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विनोदी कथालेखकांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम परिषदेतर्फे आयोजित विनोदी कथा लेखन स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे याचा आनंद वाटतो. यातून नव्या पिढीचे कथाकार समाजासमोर येतील."